Plastic in Blood : पाण्याच्या बाटलीपासून ते रोजच्या वस्तूंपर्यंत आपल्या दररोजच्या जगण्यात प्लास्टिकचा वापर इतका वाढलाय की त्याचे विपरीत परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागतायेत. आता हेच प्लास्टिक माणसाच्या रक्तापर्यंत कसं पोहचलंय याबाबतचं एक धक्कादायक संशोधन समोर आलं आहे.
प्रदूषणामुळे माणसाच्या शरीरावर विपरीत परिणाम होत आहे. मात्र आता हे दुष्परिणाम थेट तुमच्या रक्तावर व्हायला लागल्याची धक्कादायक माहिती एका संशोधनातून समोर आलीय. याला कारण आहे प्लास्टिकचं....
प्लास्टिसारख्या घातक पदार्थांचे भयानक दुष्परिणाम आपल्या शरिरावर होत आहेत. जगभरातील तब्बल 80 टक्के लोकांच्या शरीरातील रक्त प्लास्टिकमुळे दूषित झाल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केलाय. डचमधल्या संशोधकांनी यावर एक रिसर्च केलाय.
या संशोधकांनी नेदरलँडमधील वेगवेगळ्या वयोगटातील 22 लोकांच्या रक्ताच्या नमुन्यांची तपासणी केली. त्यातील 17 जणांच्या रक्तात मायक्रोप्लास्टिक आढळून आलं. विशेष म्हणजे एका आठ वर्षांच्या मुलीच्या रक्तातही प्लास्टिक सापडलंय. ही मुलगी दररोज सिंथेटीक मटेरियलच्या खेळण्यांसोबत खेळते त्याचाच हा परिणाम असल्याचा निष्कर्ष संशोधकांनी काढलाय. विशेष म्हणजे कोणत्या ना कोणत्या माध्यमातून दररोज मानवी शरीरात 7 हजार प्लास्टिकचे कण प्रवेश करतात असाही दावा या संशोधकांनी केलाय.
अर्थात ज्या रूग्णांच्या रक्तात प्लास्टिकचे अंश सापडले त्यांना सध्यातरी कोणतेही गंभीर आजार नाहीत. मात्र हे प्लास्टिक शरीरात ब्लॉकेजेस तयार करू शकतात. त्यामुळे त्यांना भविष्यात गंभीर आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
प्लास्टिकमुळे रक्ताचा कॅन्सर, डायबिटिज, पोटाचे विकार होऊ शकतात. आतड्यांना इजा पोहचून पचनाची क्रिया बिघडू शकते. याशिवाय श्वसनाचे गंभीर आजार होऊ शकतात.
प्लास्टिकचा अतिवापर निसर्गासाठी आणि मानवी शरीरासाठी किती घातक आहे याची आपल्याला कल्पना आहे. तरीही आपण प्लास्टिकचा अट्टाहास सोडायला तयार नाहीत. मात्र आपण प्लास्टिकला आळा घातला नाही तर भविष्यात आरोग्याचं संकट बळावल्याशिवाय राहणार नाही.