Data Collection Operator in Tesla: इलेक्ट्रीक कार बनवणारी दिग्गज कंपनी टेस्लाने (Tesla) नोकरीची एक अनोखी संधी उपलब्ध करुन दिली आहे. या नोकरीत कर्मचाऱ्याला दररोज सात तास चालावं लागणार आहे. यासाठी त्याला प्रत्येक तासाला 48 डॉलर म्हणजे भारतीय रुपयात 4000 रुपये दिले जाणार आहेत. हे पैसे टेस्लाच्या रोबोट (Robot) ऑप्टिमसच्या प्रशिक्षणासाठी दिले जाणार आहेत. कर्मचाऱ्यांना मोशन कॅप्चर तंत्रज्ञानाद्वारे रोबोटला शिकवावं लागणार आहे. अशा प्रकारे कर्मचारी दररोज 28,000 रुपये कमवू शकतात. त्यानुसार, एका महिन्यात हे पैसे सुमारे 8.5 लाख रुपये इतके होतात.
रोबोटवर दोन वर्षांपासून काम
टेस्लाचे मालक एलन मस्क (Elon Musk) यांनी 2021 मध्ये पहिल्यांदा ऑप्टिमस (Optimus) नावाच्या या रोबोटची माहिती दिली होती. हा रोबोट प्रत्येक काम करु शकेल हा मस्क यांचा उद्देश आहे. कारखान्यात काम असो, की लोकांची देखभाल करणं असो मानवी रोबोट सर्व काम करु शकेल या दृष्टीने प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. गेल्या एक वर्षात टेस्लाने या रोबोटवर प्रचंड मेहनत घेतली आहे. रोबोटला मानवी गोष्टी शिकवण्यासाठी काही लोकांनाही टेस्लाने कामावर ठेवलं आहे.
डाटा कलेक्शन ऑपरेटरचा जॉब
आता टेस्लाने डाटा कलेक्शन ऑपरेटरसाठी नोकरी ऑफर केली आहे. या कामात लोकांना रोबोटला माणसासारखं चालणं शिकावायचं आहे. यासाठी निवड झालेल्या कर्मचाऱ्यांना खास पद्धतीचे कपडे दिले जाणार आहेत. यात मोशन कॅप्चर सूट आणि व्हर्च्युअल रिअॅलिटी हेडसेट घालावे लागणार आहेत. दिवसातले सात तास त्यांना रोबोटबरोबर चालावं लागणार आहे. या कामात डेटा गोळा करणं, त्याचं विश्लेषण करणं, अहवाल लिहिणं आणि छोट्या उपकरणांशी संबंधित माहिती गोळा करणं ही कामं समाविष्ट आहेत.
पण या कामासाठी काही अटीदेखील ठेवण्यात आल्या आहेत. अर्ज करणारा उमेदवाराची उंची 5 फूट 7 इंच ते 5 फूट 11 इंच इतकी असावी. याशिवाय उमेदवाराला कमीत कमी 30 पाऊंडचं वजन उचलता आलं पाहिजे.
नोकरीबरोबर अनेक सुविधा
टेस्लाच्या नोकरीत मोठया पगाराबरोबरच कर्मचाऱ्यांना अनेक सुविधाही पुरवल्या जाणार आहेत. यात वैद्यकिय सुविधा, दात आणि डोळ्यांचे उपचार, निवृत्ती सुविधांचा समावेश आहे. याशिवाय इतर अनेक सुविधाही देण्यात येणार आहेत. टेस्ला बेबीज प्रोग्रॅम, वजन कमी करणं, धुम्रपान सोडवण्यासाठी प्रोग्रॅम आणि इतर इन्शोरन्स पर्याय देण्यात येणार आहेत.