युरोपमध्ये कोरोनाची परिस्थिती भीषण; या देशांमध्ये पुन्हा लॉकडाऊन!

युरोपमध्ये कोरोनाने थैमान माजवलं आहे. याठिकाणी काही देशांमध्ये कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. 

Updated: Nov 14, 2021, 12:23 PM IST
युरोपमध्ये कोरोनाची परिस्थिती भीषण; या देशांमध्ये पुन्हा लॉकडाऊन! title=

युरोप : युरोपमध्ये कोरोनाने थैमान माजवलं आहे. याठिकाणी काही देशांमध्ये कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने ताज्या ब्रीफिंगमध्ये माहिती दिली आहे की, युरोपमध्ये गेल्या एका आठवड्यात कोरोनाव्हायरसची 2 दशलक्ष प्रकरणं आहेत. त्याच वेळी, कोविड -19 मुळे 27,000 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

गेल्या आठवड्यात संपूर्ण जगामध्ये झालेल्या मृत्यूच्या तुलनेत ही संख्या निम्मी आहे. विशेष बाब म्हणजे पूर्व युरोपातील ज्या देशांमध्ये लसीकरण कमी झालं आहे, तिथे कोरोना विषाणूचे रुग्ण वाढले आहेत. 

त्याच वेळी, पश्चिम युरोपमधील ज्या देशांमध्ये लसीकरणाचं प्रमाण सर्वाधिक आहे, तिथेही प्रकरणं वाढत आहेत. युरोप पुन्हा एकदा कोरोनाचं एपिक सेंटर बनत असल्याचं बनत असल्याचं समोर येतंय. त्याच वेळी, अनेक युरोपीय देशांनी पुन्हा एकदा कोविड-19शी संबंधित नियम लावण्यास सुरुवात केली आहे.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने आपल्या ब्रीफिंगमध्ये सांगितलं की, विशेषतः निरोगी लोकांना कोरोना बूस्टर डोस देण्यासाठी कोणतंही समर्थन केलेलं नाही. WHO ने सांगितलं की, आजही जगातील अनेक देशांमध्ये आरोग्य कर्मचारी, वृद्ध आणि उच्च जोखीम श्रेणीतील लोकांना लसीचा पहिला डोस मिळालेला नाही. 

27 सदस्यीय युरोपियन युनियनमधील 10 देशांमधील कोविड-19 साथीची परिस्थिती चिंताजनक आहे. ब्लॉक डिसीज एजन्सीने शुक्रवारी ही माहिती दिली. युरोपियन सेंटर फॉर डिसीजेसने तयार केलेल्या अहवालानुसार बेल्जियम, बल्गेरिया, क्रोएशिया, चेक रिपब्लिक, एस्टोनिया, ग्रीस, हंगेरी, नेदरलँड, पोलंड आणि स्लोव्हेनियामध्ये परिस्थिती अत्यंत वाईट आहे.