इस्लामाबाद : आतापर्यंत आपण या न त्या कारणाने नद्या प्रदूषित झाल्याचे पाहिलं असेल. पण, पाकिस्तानातील लाहोरमधील रावी नदी मात्र एका नव्याच कारणामुळं चर्चेत आलीय. इतकंच नव्हे तर त्या कारणाने ही नदी जगभरात नंबर वन ठरलीय.
इंग्लंडमधील यॉर्क विद्यापीठातील संशोधकांनी जगभरात असलेल्या नद्यांमधील औषध प्रदूषणाचे प्रमाण शोधण्यासाठी एक संशोधन केलं. त्यांनी अमेरिकेच्या नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्सेसच्या प्रोसिडिंग्जमध्ये नद्यांमधील औषध प्रदूषणाच्या पातळीचा शोध घेण्याचा एक अहवाल प्रकाशित केलाय.
या अहवालात पाकिस्तानच्या नद्या सुरक्षित नाहीत. यापैकी लाहोर शहराच्या अगदी जवळ असलेली रावी नदी सर्वाधिक औषध प्रदूषणाने प्रभावित असल्याचं म्हटलं आहे. या प्रदूषित नद्यांच्या यादीत लाहोरच्या रावीला पहिले स्थान मिळाले आहे.
'रावी नदीत अंमली पदार्थांचे प्रमाण सर्वाधिक'
लाहोरमधून गोळा करण्यात आलेल्या रावी नदीच्या नमुन्यांमध्ये सर्वाधिक प्रमाणात औषधे आढळून आली आहेत. जी पर्यावरणासोबतच मानवी आरोग्यासाठीही हानिकारक आहेत. या नदीच्या पाण्यात पॅरासिटामॉल, निकोटीन, कॅफीन, एपिलेप्सी आणि मधुमेहावरील औषधांचे अंश सापडले आहेत.
बोलिव्हिया दुसऱ्या आणि इथिओपिया तिसऱ्या क्रमांकावर
सदर संशोधन अहवालात बोलिव्हियातील ला पाझ आणि इथिओपियातील अदिस अबाबा शहरातील नदी दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. तर, आइसलँड, नॉर्वेच्या जंगलांतून वाहणाऱ्या नद्या आणि नद्यांचाही यात समावेश आहे. त्या मानानं Amazon नदी सर्वात कमी प्रदूषित आहे.