Indian Cough Syrup: भारतीय बनावटीच्या कफ सिरपमुळं उजबेकिस्तानमध्ये 65 मुलांचा कथित मृत्यू झाल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. आता या प्रकरणात मोठा खुलासा करण्यात आला आहे. भारतीय कफ सिरपच्या (Cough Syrup) वितरकांनी अनिवार्य चाचणी टाळण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांना $33,000 (सुमारे 28 लाख रुपये) ची लाच दिली असल्याचा आरोप उझबेकिस्तानच्या सरकारी वकिलांनी न्यायालयीन कामकाजादरम्यान केला आहे. (Uzbekistan Children Deaths)
गेल्या आठवड्यात झालेल्या मृत्यूप्रकरणी मध्य आशियाई देशाने 20 उझबेक नागरिक आणि एका भारतीय नागरिकांसह 21 लोकांवर खटला चालवला आहे. प्रतिवादींपैकी तीन (एक भारतीय आणि दोन उझबेकिस्तानी) नागरिक हे कुरामॅक्स मेडिकलचे अधिकारी आहेत. उझबेकिस्तानमध्ये भारताच्या मेरियन बायोटेकची औषधे विकणारी ही कंपनी आहे.
कुरामॅक्सने सिंगापूर येथील दोन कंपन्यांद्वारे मध्यस्ती करुन अधिक किंमतीत मेरियन बायोटेक ही औषधे आयात केली होती, ज्यामुळे कर चुकवेगिरीचे आरोप झाले होते, अशी माहिती राज्य वकिलांनी बुधवारी कोर्टात दिली आहे.
राज्य सरकारी वकील सैदकरिम अकिलोव्ह यांच्या म्हणण्यानुसार, Quramax CEO सिंह राघवेंद्र प्रतार यांनी कथितपणे राज्य आणि केंद्रातील अधिका-यांना औषधी उत्पादनांचे कौशल्य आणि प्रमाणीकरणासाठी $33,000 दिले जेणेकरून ते त्याच्या उत्पादनांची अनिवार्य तपासणी टाळतील, असा आरोप करण्यात आला आहे. मात्र, कफ सिरफची उझबेकिस्तानमध्ये चाचणी घेण्यात आली होती की उत्पादकांना भारतात चाचण्या घेण्याची विनंती करण्यात आली होती का? हे फिर्यादीच्या वक्तव्यावरून अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मागील वर्षी उजबेकिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाने आरोप केला होता की, भारतीय बनावटीच्या कफ सिरफ (DOK-1 MAX)मुळं त्यांच्या देशातील 18 मुलांचा मृत्यू झाला होता. त्यामुळं या प्रकरणात जागतिक आरोग्य यंत्रणेने हस्तक्षेप करुन तपास करण्यास मदत करावी, अशी विनंती केली होती. भारत सरकारनेही आरोपोंच्या तपासणीचे आदेश दिले होते.
नोएडा येथील मेरियन बायोटेक फार्मा कंपनीने बनवलेले कफ सिरप DOK-1 MAX प्यायल्याने मुलांचा मृत्यू झाल्याचा आरोप उझबेकिस्तानने केला होता. कफ सिरप DOK-1 MAX मध्ये इथिलीन ग्लायकॉल आहे, असं उझबेकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होतं.