मुंबई : शरीरसंबंधांमध्येही फक्त एकाच व्यक्तीची सहमती नसून, त्याकरता दुसऱ्याही व्यक्तीचा होकार असणं हे तितकच महत्त्वाचं असतं. मुळात ही बाब किती महत्त्वाची असते हेच लक्षात घेत एक नवी संकल्पना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. अर्जेंटिनाच्या एका सेक्स टॉय कंपनीने एक अशा कंडोमची कल्पना शोधली आहे, ज्याविषयीच्या बऱ्याच चर्चा सध्या सोशल मीडियावरही चर्चेत आहेत. 'ट्युलिपन' या अर्जेंटिनाच्या कंपनीने हा कंडोम तयार केला असून, त्याचं पाकिट उघडण्यासाठी एकूण चार हातांची गरज लागणार आहे. सोशल मीडियावर यासंबंधीचा एक व्हिडिओही पोस्ट करण्यात आला आहे.
ट्युलिपन अर्जेंटिनाच्या ट्विटर अकाऊंटवरुन सेफ सेक्स अर्थात सुरक्षित शरीरसंबंधांविषयी जनजागृती निर्माण करण्याच्या दृष्टीने या नव्या पद्धतीच्या कंडोमचा एक व्हिडिओही पोस्ट करण्यात आला आहे. ज्यामध्ये ते पाकिट कसं उघडायचं हे दाखवण्यात आलं आहे. पाकिटाच्या चोपऱ्यांवर एकाच वेळी हात ठेवून ते उघडता येतं. या माध्यमातून शरीरसंबंधांसाठी दोन्ही व्यक्तींची सहमती असल्याचं प्रतीत होतं.
Este pack es tan simple de abrir como entender que si no te dice que sí, es no. #PlacerConsentido pic.twitter.com/KHWyoFmg7L
— Tulipán Argentina (@TulipanARG) April 3, 2019
ट्विटरवर पोस्ट करण्यात आलेल्या या व्हिडिओच्या कॅप्शनचं भाषांतर केलं असता “If it’s not a yes, it’s a no.” असा त्या ओळीचा अर्थ समोर येत आहे. त्यामुळे शरीरसंबंधांसाठी मानसिक तयारीसोबतच परस्परांची सहमतीही तितकीच महत्त्वाची असल्याचा महत्त्वाचा संदेश ओळीतून स्पष्ट होत आहे. या वर्षाअखेरीस हा कंडोम बाजारामध्ये विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. सध्याच्या घडीला या कंडोमची चाचणी सुरू असून, त्याच्या जाहिरातीला विशेष लोकप्रियता मिळत आहे हे मात्र अगदी खरं.