रवी पत्की, क्रिकेट विश्लेषक : भारताने इंग्लंडचा मालिकेत 3-1 असा पराभव केला आणि दुसऱ्या संघाच्या कामगिरीवर अवलंबून न रहाता, मागच्या दाराने खटपटी न करता राजमार्गाने लॉर्ड्सचे दार किलकिले करून नाही तर दिमाखात सत्ताड उघडले. कसोटीच्या विश्वविजेतेपदाच्या स्पर्धेत तक्त्यात पहिल्या स्थानावर ध्वजारोहण केले. भारत क्रिकेटची आर्थिक महासत्ता असली तरी खेळातील मेरिटच्या सर्वोच्य सन्मानासाठी भारताने आपले सर्वस्व पणाला लावून त्या सिंहासनावर विराजमान होणे ही जास्त प्रतिष्ठेची गोष्ट आहे.
क्रिकेटमधून भारताला वगळले तर बिन गणपतीचा मांडव होईल. ऑस्ट्रेलियात भारताचा सामना असू द्या नाहीतर इंग्लंडमध्ये असुद्या 80%प्रेक्षक भारतीयच असतात.80%प्रायोजक भारतीयच असतात. 80% टीव्हीचा प्रेक्षक भारतीय असतो. इंग्लंडमध्ये झालेल्या 2019 च्या विश्वचषक स्पर्धेत खुद्द इंग्लंडमध्ये इतका उल्हास होता की अनेक केबल चालकांनी क्रिकेट चॅनल दाखवले सुद्धा नाहीत.
क्रिकेटची खरी क्रेझ भारतीय उपखंडातच आणि भारत क्रिकेटची राजधानी. क्रिकेटमधल्या मेरिटवर हा महासत्तेचा मुकुट सर्वाधिक शोभून दिसणार आहे. म्हणून भारताने कसोटीच्या अजिंक्यपदाच्या स्पर्धेत स्वतःला सिद्ध करणे अत्यावश्यक होते. त्या प्रोसेस मध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड ह्या दोन अढ्यातेखोरांना लोळवले हे उत्तम झाले. ऑस्ट्रेलियातला विजय अविश्वसनीय होता तर इंग्लंडवरचा सुखद.
इंग्लंड विरुद्ध सिरीजमध्ये पहिल्या सामन्या नंतर शंकेचे मळभ आले होते.पण पुढच्या तीन सामन्यात घरच्या परिस्थितीचा अचूक फायदा घेत इंग्लंडला पार लोळवून टाकले. दोन चार सेंटीमीटर गवताची लव लव करणारी पाती खेळपट्टीवर ठेऊन ढगाळ हवामानात ड्युक बॉल वर अडीच तीन दिवसात मॅच संपवणे हा इंग्लंडचा पाहुण्यांना दिलेला पाहुणचार असतो. तसेच टर्निंग ट्रॅक वर फुटवर्क येत नसेल आणि तुमच्या गोलंदाजाना स्पिन आणि बाऊन्स मिळत नसेल तर इंग्लंडच्या पराभवाला 'नाचता आले नाही' हेच कारण जबाबदार.
पुढे खेळू का मागे,आक्रमण करू का संरक्षण अशी मनस्थिती फलनदाजांची असेल तर टर्निंग ट्रॅक वर लघु रुद्राची 21 आवर्तने केली तरी उपयोग होत नाही.स्पीनरच्या आर्मर चेंडूचा अंदाजच येत नसेल आणि चेंडू पॅड वर आदळत असेल तर दौऱ्यावर किटमध्ये बॅटिंचे घड घेऊन कशाला यायचे?
सरळ चेंडू मिस होऊन इतके पायचीत झालेले बॅट्समन आठवत नाहीत. गोलंदाजीत सुद्धा दोन पैकी एका स्पिनरचा पहिला टप्पा थेट बॅट्समनच्या बॅट वर पडत असेल(चेंडूचा खेळपट्टीशी संपर्क झाल्यास शपथ) तर भारतात येऊन भारताला लोळवणे हे इंग्लंडला फुटबॉल मध्ये शक्य होऊ शकते. क्रिकेट मध्ये सोडा. भारताच्या सखोल बॅटिंगने पुन्हा गुदगुल्या झाल्या.
पंत,वॉशिंग्टन,अश्विन यांचे कौतुक आहेच पण रोहितची मोक्याची योगदाने मालिकेला दिशा देऊन गेली.
पंतने अँडरसनला रिव्हर्स स्वीप मारल्यावर अँडरसन संध्याकाळी निवृत्तीची प्रेस काँफरन्स घेतो का काय असे वाटले. जगातल्या सर्वोत्कृष्ट फास्ट बॉलरचा मिडल स्टंप वरचा बॉल स्लीपच्या डोक्यावरून रिव्हर्स करायला तारुण्याची सणक लागते आणि डीविलीअर्सचे स्किल.
पंतला दोन्ही पावले आणि समालोचकांनी आ वासले. असे अपघात क्रिकेटमध्ये अपघातानेच होतात.पहिल्या सामन्या नंतर घरेलू संघाला पोषक खेळपट्ट्या बनवणाऱ्या ग्राऊंडसमनचे आभार मानणे फार महत्वाचे आहे. इंग्लंडचा संघ नेहमी प्रमाणे बऱ्याच थिअरीज घेऊन,अभ्यास करून आला होता पण त्यांच्या ओठात आणि कपात बरेच अंतर पडले आणि चहाची चव भारताला मिळाली. आता वर्ल्ड चॅम्पियन व्हायचे म्हणजे व्हायचे. गो इंडिया गो.