बीड पुन्हा हादरलं! दोन सख्ख्या भावांच्या मृत्यूमुळे उडाली खळबळ

Beed Crime:  बीडमध्ये जमावाच्या हल्ल्यात 2 सख्ख्या भावांचा मृत्यू झालाय. 

Pravin Dabholkar | Updated: Jan 17, 2025, 03:08 PM IST
बीड पुन्हा हादरलं! दोन सख्ख्या भावांच्या मृत्यूमुळे उडाली खळबळ title=
बीड हत्या

Beed Crime: बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. याचे पडसाद राज्यभरात उमटले. सर्व स्तरातून याबद्दल संताप व्यक्त करण्यात आला. संतोष देशमुख प्रकरणात मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह नऊ जणांवर मकोका लावला आहे. घुले याला गँगचा प्रमुख करण्यात आलं. तर वाल्मिक कराडला सदस्य करण्यात आलंय. आरोपी कराडवर हत्येचा कट रचल्याचा ठपका ठेवत मकोका लावला. आतापर्यंत 9 आरोपींवर मकोका लागलाय. कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे. या प्रकरणी आणखी आरोपी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान बीड जिल्हा पुन्हा हादरलाय. 

बीडमध्ये जमावाच्या हल्ल्यात 2 सख्ख्या भावांचा मृत्यू झालाय. यात एकजण गंभीर जखमी झालाय. बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यात जमावाच्या हल्ल्यात दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.

आष्टी तालुक्यातील वाहिरा येथे गुरुवारी रात्रीच्या सुमारास त्यांच्याच समाजातील काही लोकांनी लोखंडी रॉड, धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात दोन संख्या भावांचा जागीच मृत्यू झाला. तर आणखी एक जण गंभीर जखमी आहे. याप्रकरणी अंभोरा पोलीस अधिक तपास करत आहेत.

अजय भोसले आणि भरत भोसले असे मयताचे नाव असून कृष्णा भोसले हा गंभीर जखमी आहे. हे तिघेही त्यांच्या गावात उभे असताना गावातील आणि बाहेरील काही लोक जमा झाले. यातील लोकांनी या तीनही भावांवर शस्त्राने हल्ला चढवला. आणि ही घटना घडली आहे. हा खून नेमका कोणत्या कारणाने झाला? हे मात्र अद्याप समजले नसून आष्टी ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन सुरू आहे.

सरपंच देशमुखांचा भाऊ आणि पत्नीचा जबाब घेणार

सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांचा आज जबाब घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. देशमुख हत्या प्रकरणात न्यायालयात संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख आणि पत्नी अश्विनी देशमुख यांचा जबाब घेतला जाणारेय त्यातील धनंजय यांचा आज जबाब घेतला जाणार आहे त्यानंतर संतोष देशमुख यांच्या पत्नीचा देखील जबाब होणार आहे. हत्या प्रकरणाचा तपास आतापर्यंत उपअधीक्षक अनिल गुजर करीत होते. परंतु, आता आरोपींना मकोका लागला. त्यानंतर वाल्मीक कराड याचाही सहभाग आढळला. त्यामुळे गुजर यांच्याकडून तपास काढून घेत छत्रपती संभाजीनगरच्या सीआयडी अपर पोलिस अधीक्षक किरण पाटील यांच्याकडे तपास देण्यात आला आहे. यासह 6 डिसेंबरच्या मारहाण आणि अॅट्रॉसिटीचा तपासही पाटील यांच्याकडे दिला आहे. खंडणीचा तपास गुजर यांच्याकडे कायम असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

गोळीबाराने अंबाजोगाई हादरलं

बीडच्या अंबाजोगाईत गोळीबाराची घटना घडली. जमिनीच्या वादातून मोरेवाडी परिसरात हवेत गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. पोलीस घटनास्थळी रवाना झाले आहेत. अंबाजोगाई शहरातील मोरेवाडी परिसरात यामुळे खळबळ उडाली आहे.