Imran Khan 14 Years jailed: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि तहरीक-ए-इंसाफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांना पाकिस्तानी न्यायालयाने मोठी शिक्षा सुनावण्यात आली आहे. अल-कादिर ट्रस्ट प्रकरणात पाकिस्तानी न्यायालयाने इम्रान खान यांना 14 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. इम्रान खानचे हे प्रकरण भ्रष्टाचाराशी संबंधित आहे. या प्रकरणात त्यांची पत्नी बुशरा बीबी यांनाही दोषी ठरवण्यात आले असून त्यांना 7 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे.
इतकंच नाही तर इम्रान खानची पत्नी बुशरा बीबीलाही तात्काळ अटक करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. पोलिसांनी त्यांना कारागृहाच्या आवारातच घेरले आणि अटकेची प्रक्रिया पूर्ण केली. अदियाला कारागृहातील तात्पुरत्या न्यायालयात न्यायाधीश नासिर जावेद राणा यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. त्यासोबतच दोघांनाही 10 लाख आणि 5 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
नेमकं प्रकरण काय?
रिपोर्टनुसार, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि पत्नी बुशरा बीबी यांनी बहरिया टाऊन लिमिटेडकडून अब्जावधी रुपये आणि शेकडो कनाल जमीन घेतल्याचा आरोप केला होता. ही रक्कम युनाइटेड किंग्डमने पाकिस्तानला परत केलेल्या 50 अब्ज रुपये कायदेशीर करण्यासाठी देण्यात आली होती. इस्लामाबादच्या उच्च न्यायालयाने या प्रकरणी डिसेंबर 2023 मध्ये या प्रकरणी निकाल देण्यासाठी 6 जानेवारी ही तारीख निश्चित केली होती. मात्र, न्यायाधीशांची अनुपस्थिती आणि इतर कारणांमुळे हे प्रकरण लांबणीवर पडले.
नॅशनल अकाउंटबिलिटी ब्यूरोने डिसेंबर 2023 मध्ये इम्रान खान आणि इतर सात जणांविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला होता. बेकायदेशीरपणे राज्याचा निधी बहरिया टाउनच्या जमीन पेमेंट खात्यात हस्तांतरित केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणात पीटीआयचे माजी अधिकारी यांचा देखील समावेश आहे.