सुवर्णा धानोरकर, झी मीडिया, मुंबई : लहान मुलाने विचारलं की आई/ बाबा माझा जन्म कसा झाला? काय उत्तर देतो आपण? मुलाचं वय पाहून त्याला कळेल असं उत्तर नको का द्यायला? की मग त्याच क्षणाला त्याला ओरडून गप्प करणार? या गप्प करण्यात नाही का बलात्काराचं मूळ? या गप्प करण्यानं लहानपणीच या वृत्तीची पाळंमुळं खणली जात आहेत. असं नाही का वाटत? अशाच नाजूक विषयांना त्या त्या वयात झेपेलं असं उत्तर का देऊ शकत नाही? मुलाच्या रडण्यापासून ते घरकाम करण्यापर्यंत त्याला हिणवलं जातं. मुलींची कामं म्हणजे कमी दर्जाची, मुलगीच कमी दर्जाची ती सतत आपल्यापेक्षा कमीच दिसायला हवी हे मनावर हॅमर होत राहतं. त्यातूनच मग महिला म्हणजे उपभोगाचं साधन हा विचार मनात आकार घेत जातो. मी जर एखाद्या महिलेला जास्त रिस्पेक्ट दिला तर माझं समाजात हसं होईल. आणि याच भीतीपोटी मग मनातले हे विचार जास्त आक्रमक होत जातात.
वाट्टेल ते झालं तरी मी महिलेला माझ्या पुढे जाऊ देणार नाही तिला माझ्यावर हावी होऊ देणार नाही. एकदा का तुमच्या विचारांची आक्रमकता वाढत गेली की त्यासाठीची कृतीही तितकीच आक्रमक होत जाते, कधी कधी ती घातकही होते. हीच घातक वृत्ती कधी कधी बलात्काराच्या घटनांच्या रुपात पुढे येते. काही दिवसांपूर्वी एका उत्तर भारतीयाच्या रिक्षात बसले. कशावरून तरी आमचा संवाद सुरू झाला. त्यानं पुरुषी अहंकारात बोलायला सुरुवात केली. ४ महिने हुए मॅडम शादी को, इतने में मेरी औरत मेरी माँसे झगडे करने लगी. परसो मे दोपहर को घर गया, माँ ने बिवीको बोला खाना लगाने के लिये तो बिवी लेटी थी सिधे मना करी... बोलती है, 'आप ले लो मेरे को ठिक नही लग रा सोती हूँ थोडा.' मेरा खून खोला मेने असे दंडे मारे उसको. मेरी माँ को मना करती है, तेरी माँ ने ये सिखाया. मॅडम आपको बोलता हूँ एक घंटा रो रही थी, मार खाया फिर जाके मेरी माँ को खाना दिया उसने, हाय पैर सुज गये थे दंडे खा खा के. तबसे आँख उठा के बात नही करती हमसे... तो थांबला तशी मी त्याला म्हणाले 'बेहन है क्या तुम्हे...' हाँ है ना, 'तुमने तुम्हारी औरत के साथ जो किया वैसा किसीने तुम्हारी बहेन के साथ किया तो, या तुम्हारे बापने तुम्हारी माँ के साथ किया तो...? उत्तर अपेक्षित नव्हतचं मला... पण त्याला काय सांगायचं ते एका वाक्यात सांगितलं.
माझं वाक्य ऐकून तो शांत झाला पण रिक्षाच्या वाढलेल्या गतीमधून जाणवलं, त्याच्या मनात काय सुरू असेल... ये औरत कौन होती है मुझे ऐसे बोलने वाली. इसको क्या करना है, मेरी औरत को मे मारू या ओर कुछ करूँ, इसका क्या जाता है. औरते तो होतीही है मार खाने लायक. हा विचार त्याच्या मनात आलाच असेल. जे तो लहानपणापासून पाहात आलाय ऐकत आलाय तेच त्याच्यावरचे संस्कार. त्यातून घडला आणि स्त्री म्हणजे माझी गुलाम, माझं घरचं-दारचं फ्रस्ट्रेशन काढण्याचं चालतं-बोलतं साधन. माझं फ्रस्ट्रेशन हव्या त्या पद्धतीनं मी काढणार आणि तिनं ते न रडता, न तक्रार करता सहन करायचं. फ्रस्ट्रेशन काढताना मग मी तिच्या आईबापाचा उद्धार केला तरी तो तिनं सहन करायचा. पण तिनं माझ्या आईबापाचा उद्धार करायचा नाही. मी तिला लाथाबुक्क्यांनी तुडवीन, बुकलून काढीन तिनं गप्प बसायचं. मला हवं तेव्हा, हवं तितक्यांदा मी तिच्याशी शारीरिक संबंध ठेवीन तिनं तोंडून ब्रही काढता कामा नये.
हे विचार मनात कुरवाळणारे आसपास लाखो पुरुष असतील. त्यातले कितीतरी असेही पुरुष असतील की जे नवरात्र काळात देवीच्या नावे उपवास करत असतील. ही आपली संस्क़ृती, ही आपली शिकवण. तू मूर्ती रुपात राहा मी तुला पूजीन तुझी आराधना करीन. पण तुझा दिवा फुंकला की लागलीच तू माझी गुलाम. माझं उपभोगाचं साधन... का ? हे घरात आसपास बघता बघता मुलं पौगंडावस्थेत येतात. याच वयात काहींच्या मनात एखादा बलात्कारी आकार घेत असतो. या वयात तो कधी वडिलांकडे जाऊन बोलू शकत नाही, कारण त्यांचा दरारा.. त्याला काय होतंय हे तो बापाला विचारू शकत नाही. मग मनातली ही विशिष्ट घालमेल मित्रच समजू शकतात. यातल्या एखाद्यानं जर शारीरिक संबंध अनुभवले असतील तर मी कसा मर्द आहे आणि मी समोरचीला कसं ताब्यात ठेवलं हे सांगताना त्याच्या डोळ्यातली चमक आजूबाजूची मुलं पाहत असतात.
मग त्यांनाही स्वतःच्या डोळ्यात ही चमक हवी असते. कित्येकदा या अवास्तव विचारातूनही घडतो एक बलात्कारी. अशा वेळी एक विचित्र मानसिकता या मुलांमध्ये तयार होत असते मनाला आणि शरीरालाही शांतता मिळवायला एकच साधन मुलगी, असं त्यांना वाटत राहतं. पण मुलगी सहजासहजी मिळवता येत नाही, पण घरी तर पाहिलंय स्त्रीला आपल्याला नाही म्हणण्याचा अधिकार नाही. एखादीनं म्हटलंच नाही तर अहं दुखावतो मग फेक ऍसिड नाहीतर कर बलात्कार, आणि अहं सुखावून मिळव आसुरी आनंद. यातून कितीतरी कुटुंब आपण उध्दवस्त करतोय हेच त्याला लक्षात येत नाही.
हे सगळं आपण रोखू शकत नाही का? पौगंडावस्थेतल्या मुलाला समजून घेणं इतकं कठीण आहे? मुलगी वयात आली की आई तिला सगळं समजावून सांगते... आता काय काय घडणार आणि तुला ते कसं पार पाडायचंय त्यातून शरीर कसं बदलणार हेही सांगते. सोबतीला सल्ला असतोच 'आता जपून हं! तुझ्या शरीराकडे कुठली नजर कशी वळते त्यावर लक्ष ठेवायचं. सावध राहायचं! (वेळ पडली तर दोन हात करायची तयारी ठेवायची- हे आजची आई सांगते) स्वतःला जपायचं, वाहवत जायचं नाही...' सगळं सगळं सांगते. पण वयात येणाऱ्या मुलाला त्याचा बाप तुझ्या शरीरात आता कसे बदल होणार हे सांगतो का? वयात येणाऱ्या मुलाची घालमेल त्याला समजावून सांगेल का कुठला बाप? 'बाबा रे! तुझ्या शरीरात असे बदल होतायत, एखादी मुलगी, महिला दिसली की मनात गार वाऱ्याची झुळूक संचारले. तुझ्या मनाची घालमेल होईल. तेव्हा सांभाळायचं स्वत:ला. तू मोठा होत असल्याची ती लक्षणं आहे. मीही यातून गेलोेय. तुला याबाबत काहीही प्रश्न असतील तर मला विचार मी शंकांचं निरसन करीन. तुला सगळं समजावून सांगेन...'
मी तरी आजवर असं घडताना पाहिलं नाही. आई नित्यनेमानं मुलीला सगळं सांगताना सररास दिसते. पण असा बाप दिसत नाही. बाप दिसतो फक्त पैसे कमावून आणणारा. मुलांच्या गरजा पूर्ण करणारा. पण प्रत्येक मुलाला हवा असतो वयात आल्यावर भावनिक ओढाताण समजून घेणार बाप. भावनांचा हा गुंता सोडवणारा बाप. एखाद्या मुलीला पाहिलं की असं का होतं हे कोडं उलगडणारा बाप. शक्य आहे कुठल्या बापाला हे? सांगेल कुठला बाप त्याच्या मुलाला, इरेक्शन म्हणजे काय? का होतं हे? अशा वेळी मुलानं काय करायला हवं?
आज कित्येक पुरुष मुलांसोबत मित्रासारखे राहताना दिसतात. पण अशा नाजूक विषयाबाबत बोलतात का ते मुलाशी? मुलगा मोठा झाला. आता माझे कपडे, चप्पल होते त्याला, हे सांगताना उर भरून येतो. मुलानं एखाद्या मुलीची छेड काढल्याचं कळताच हाच बाप मग उर बडवतो. पोराला बडवतो. पण ही वेळ येण्यापेक्षा मुलाला आपल्या चपला होतायत हे कळताच पुढे त्याला काय काय होणार याचीही जाणीव करून दिली तर? कदाचित कितीतरी मुली मग छेडछाडीपासूनही वाचतील.
यात फक्त बापाची भूमिका महत्त्वाची आहे असं नाही. मुलगी वयात आली की तिला लागणाऱ्या सॅनिटरी नॅपकिन्सच्या चिक्कार जाहिराती दिसतात. मग वयात येणाऱ्या मुलांसाठी नाही का प्रबोधनपर जाहिराती तयार होऊ शकत? जाहिरात हे अत्यंत प्रभावी माध्यम मग यातून साधला जाणारा परिणामही तितकाच सकारात्मक असेल ना? त्यासाठी मुलाच्या हातात सतत असणाऱ्या मोबाईलवर या जाहिराती आल्या तर?
कंडोमच्या जाहिरातीकडे बोट दाखवणाऱ्यांना माझा प्रश्न आहे खरंच फक्त या जाहिराती पाहून मुलांचं मन चाळवतं? खरंतर त्यांच्या शरीरात होत असलेल्या बदलांमुळे हे घडत असतं मग कशाला या जाहिरातींना नावं ठेवावी? मुलाची आई असणाऱ्या तमाम महिलांना माझी विनंती आहे बाप म्हणून नवरा, मुलाला समजावण्यासाठी पुढाकार घेत नसेल, तर तुम्ही पुढाकार घ्या, कल्पना द्या मुलाला काय घडतंय त्याच्या शरीरात याची. प्रत्येक बापालाही माझी कळकळीची विनंती, मुलाला समजून घ्या. त्याच्या मानसिक गरजा तुमच्याहून अधिक कुणीच समजू शकणार नाही. मुलीची पिरिएड्समधली पोटदुखी जशी आई समजू शकते तशी पौगंडावस्थेतल्या मुलाची स्थितीही फक्त बापच समजू शकतो. बापानं समजून घेणं आणि मुलाला समजावून सांगणं अविरत घडलं तर अनेक मुली छेडछाडीपासून वाचतील. या छेडछाडीला कंटाळून आत्महत्या करणाऱ्या मुलींचं प्रमाणही कमी होईल. हळूहळू बलात्काराचं प्रमाणही कमी होईल. हे स्वप्नवत वाटत असलं तरी सकारात्मकतेनं आपण प्रयत्न करायला काय हरकत आहे? काय वाटतंय तुम्हाला तुमचं मत कळवा?
यानंतरही बलात्कार झालेच तर त्या मुलीच्या मनात अपराधीपणाची भावना, आत्महत्येचे विचार येणार नाहीत ही काळजीही आपण घ्यायला हवी ना? एखाद्या दुर्घटनेत अपंगत्व आलं तर आपण त्या व्यक्तीला मदत करतोच ना पुन्हा उभं राहण्यासाठी मग बलात्कार पीडित मुलीला का मदत करू नये? तिच्या आयुष्यात ती एक मोठी गंभीर दुर्घटनाच असते. त्या जखमा भरून याव्या म्हणून समाजानंच औषध म्हणून काम करायला काय हरकत आहे?
16 डिसेंम्बर 2012ला दिल्लीत जे घडलं त्यानंतर मेणबत्त्या पेटल्या, आंदोलने झाली पण परिस्थिती बदलली नाही.
हा लेख तुम्हाला कसा वाटला? याबाबत तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया खालील लिंकवर कळवू शकता.
EMAIL: suvarnamdhanorkar@gmail.com
ट्विटर : @suvarnayb
फेसबूक: /suvarnamdhanorkar
इन्स्टाग्राम: /suvarnadhanorkar
BLOG: suvarnadhanorkar.blogspot.com