मुंबई : कोरोना संकटामुळे शाळा, महाविद्यालये बंद आहेत. मात्र, राज्यात अनेक ठिकाणी ऑनलाईन शिक्षणावर भर देण्यात येत आहे. ऑनलाई शिक्षणातून पाचवीपर्यंतच्या वर्गांना सूट देण्यात आली होती. मात्र, आता शिक्षण विभागाने सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. तसा शासन निर्णय जारी केला आहे. त्यामुळे इयत्ता दुसरीपर्यंतच्या वर्गासाठी सुद्धा ऑनलाईन शिक्षणाचे धडे मिळणार आहेत. ३० मिनिटे ऑनलाईन शिक्षण घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. यात १५- १५ मिनिटांचे दोन वर्ग घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आलेल्या सुधारित वेळापत्रकानुसार पूर्व प्राथमिकचे वर्ग सोमवार ते शुक्रवार ३० मिनिटे घेण्यात येणार आहे. यासाठी पालकांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. पहिली आणि दुसरी इयत्तेसाठी सोमवार ते शुक्रवार ३० मिनिटांमध्ये दोन सत्र घेतले जाणार असून १५ मिनिटे पालकांशी संवाद आणि मार्गदर्शन तसेच १५ मिनिट विद्यार्थ्यांना उपक्रम आधारित शिक्षण दिले जावे, असे निर्देश शाळांना दिले आहेत, तसे ट्विट शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केले आहे.
ऑनलाईन शिक्षणासाठी राज्यातील शाळांसाठी मार्गदर्शक सूचनांचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला. विद्यार्थी हित व आरोग्य लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात येत आहे. #OnlineClasses @CMOMaharashtra @scertmaha pic.twitter.com/6lQbVefXLG
— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) July 23, 2020
पूर्व प्राथमिक ते दुसरीपर्यंतच्या वर्गाला ऑनलाईन शिक्षण देणाऱ्या शाळांवर कारवाई करु नये असे अंतरिम आदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर शिक्षण विभागाने यू-टर्न घेतला आहे. उच्च न्यायालयाच्या सूचनेनंतर शिक्षण विभागाने बुधवारी नवीन परिपत्रक जाहीर केले. आता पूर्व प्राथमिक आणि पहिली, दुसरीसाठी सुद्धा ऑनलाईन वर्ग घेण्याचे वेळापत्रक दिले आहे. यामध्ये तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची ४५ मिनिटांची दोन सत्रे शाळा घेऊ शकणार आहेत. नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांची ४५ मिनिटांची एकूण चार सत्रे शाळा घेऊ शकणार असल्याचे परिपत्रकात नमूद म्हटले आहे.
दरम्यान, लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने राज्यातील शाळा सुरु करण्यासंदर्भात अंदाजे तारखा शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या होत्या. त्यामध्ये ऑनलाईन शिक्षण देण्याचेही निर्देश देण्यात आले होते. मात्र आता त्यात काही बदल करण्यात आला आहे. सुरुवातीच्या सूचनांमध्ये पूर्वप्राथमिक ते दुसरीपर्यंतच्या वर्गांना ऑनलाईन शिक्षण देऊ नये, असा निर्णय घेण्यात आला होता. मात्र पालक-शिक्षक संघटना या निर्णयाविरोधात न्यायालयात गेल्या होत्या. राज्य शासनाच्या या निर्णयाला स्थगिती मिळवली. त्यामुळे शिक्षण विभागाने हे वेळापत्रक जारी केले आहे.