मुंबई : शाळांसोबतच आता कॉलेजमध्येही मराठी भाषेकडे विद्यार्थ्यांचा कल कमी होताना दिसतोय. त्याचा परिणाम मराठी भाषा शिकवणाऱ्या प्राध्यापकांच्या नोकरीवर होऊ लागलाय.
असाच प्रकार विद्याविहार इथल्या सोमय्या कॉलेजमध्ये घडलाय. मराठी भाषेच्या प्राध्यापिकेला मान्यताप्राप्त होण्यासाठी केवळ १५ दिवस बाकी असतानाच अतिरिक्त असल्याचं सांगत काढून टाकण्यात आलं. मराठी भाषेचे वर्गच बंद करण्याचा हा डाव असल्याचा आरोप महाराष्ट्र कनिष्ठ महाविद्यालय प्राध्यापक संघटनेने केलाय.
तर विद्यार्थ्यांचा कल मराठी भाषेऐवजी परदेशी भाषा शिकण्याकडे असल्याची माहिती सोमय्या कॉलेजने दिली. त्यामुळेच मराठी भाषेचा वर्ग कमी झाल्यामुळे प्राध्यापिकेला सरप्लस केलं असल्याचं स्पष्टीकरण कॉलेजने दिलंय. येत्या आठवडाभरात कॉलेजने योग्य निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा प्राध्यापक संघटनेने दिलाय.