मध्यरात्र, घरात दरोडेखोर, रक्तबंबाळ अवस्थेतील वडील अन् ऑटो रिक्षा...; सैफचा मुलगा इब्राहिमने दाखवलं प्रसंगावधान

Saif Ali Khan Attack Latest News: बुधवारी रात्री उशिरा घरात घुसलेल्या घुसखोराशी झालेल्या भांडणात 54 वर्षीय सैफ अली खानवर चाकूने सहा वार करण्यात आले. यापैकी एक वार त्याच्या मणक्याजवळ झाला आहे.  

शिवराज यादव | Updated: Jan 16, 2025, 03:10 PM IST
मध्यरात्र, घरात दरोडेखोर, रक्तबंबाळ अवस्थेतील वडील अन् ऑटो रिक्षा...; सैफचा मुलगा इब्राहिमने दाखवलं प्रसंगावधान title=

Saif Ali Khan News: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर बुधवारी रात्री चाकूहल्ला करण्यात आला. सहा वार झाल्यानंतर सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानने रक्तबंबाळ अवस्थेत त्याला लिलावती रुग्णालयात नेलं. इब्राहिमने लिलावती रुग्णालयात (Lilawati Hospital) जाण्यासाठी रिक्षाची मदत घेतली. कार तयार नसल्याचं लक्षात आल्यानंतर त्याने वेळ वाचवण्यासाठी वडिलांनी रिक्षात बसवलं आणि रुग्णालय गाठलं. सैफ अली खानच्या वांद्रे येथील घरापासून दोन किमी अंतरावर लिलावती रुग्णालय आहे. 

हल्ल्यानंतर सैफ अली खानच्या घराबाहेरचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत सैफ अली खानची पत्नी आणि अभिनेत्री करिना कपूर रिक्षाच्या बाजूला उभी असून, घरातील कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना दिसत आहे. 

बुधवारी रात्री घरात घुसखोर आल्यानंतर झालेल्या भांडणात सैफवर चाकूने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्याला सहा जखमा झाल्या आहेत. यामधील एक वार त्याच्या पाठीच्या मणक्याजवळ झाला आहे. लिलावती रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले असून, सध्या धोक्याबाहेर असल्याची माहिती त्याच्या टीमने दिली आहे. तसंच सैफच्या कुटुंबातील इतर सर्व सदस्य सुखरुप असल्याचंही सांगण्यात आलं आहे. 

सैफ अली खानच्या घरी चोरीचा प्रयत्न झाल्याचं त्याच्या टीमने म्हटलं आहे. पोलिसांनीही त्याला दुजोरा दिला आहे. चोरीच्या उद्देशाने सैफवर चाकू हल्ला झाल्याचं पोलीस म्हणाले आहेत. तसंच एका आरोपीची ओळख पटली असल्याचंही सांगितलं आहे. 

हल्ल्याच्या दोन तास आधी सैफ अली खानच्या घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कोणीही घरात प्रवेश केल्याचं दिसलेलं नाही. याचा अर्थ ज्याने अभिनेत्यावर हल्ला केला तो आधीच इमारतीत घुसला होता आणि हल्ला करण्याची वाट पाहत होता. अभिनेत्यावर चाकूने वार करून पळून गेलेल्या हल्लेखोराची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले आहेत.

पोलिसांना हल्लेखोर घरातील एका मोलकरणीशी संबंधित असावा, ज्याने त्याला अभिनेत्याच्या घरात प्रवेश दिला होता असा संशय असल्याची सूत्रांची माहिती आहे. दरम्यान अभिनेत्यावरील हल्ल्यामुळे चित्रपटसृष्टीत भिती पसरली आहे. अभिनेत्री पूजा भट्टने म्हटलं आहे की, तिला कधीही इतकं असुरक्षित वाटलं नव्हते. तिने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वांद्रे येथे अधिक पोलिस बंदोबस्ताची विनंती केली आहे.

दुसरीकडे विरोधकांनी महायुती सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. जर सेलिब्रिटीच सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य नागरिकांचं काय? अशी विचारणा ते करत आहेत.