मुंबई : निपुण धर्माधिकारी या तरूण दिग्दर्शकाचा ‘बापजन्म’ हा सिनेमा रिलीज झालाय. या सिनेमाची घोषणा झाल्यानंतर आणि ट्रेलर पाहिल्यानंतर या सिनेमाची उत्सुकता चांगलीच शिगेला पोहोचली होती.
सचिन खेडेकर यांच्या मुख्य भूमिकेमुळे तर सिनेमाची उत्सुकता होतीच, पण त्यासोबतच निपुणचा हा पहिलाच सिनेमा म्हणूनही अनेकांना उत्सुकता होती. चला जाणून घेऊया हा सिनेमा का आवर्जून बघावा याची कारणे.
निपुण धर्माधिकारी याने याआधीही त्याचं नाटक, लेखन आणि वेब सीरिजच्या माध्यमातून वेगळेपण सिद्ध करत आला आहे. या सिनेमारूपी जहाजाचा एक परफेक्ट कॅप्टन म्हणून तो समोर आला आहे. निपुणच्या रूपाने मराठी सिने इंडस्ट्रीला एक बाप दिग्दर्शक मिळाला असे म्हटल्यास वावगे ठरू नये. निपुणच्या दिग्दर्शनाची सर्वात चांगली बाब म्हणजे त्याने अनेकदा पाहिलेलं हे कथानक खूपच वेगळ्या पद्धतीने मांडलं आहे. त्याची ही मांडणीच या सिनेमातील सर्वात इंटरेस्टींग गोष्ट आहे. त्यासोबतच त्याने उगाच कोणत्याही गोष्टींचा वापर यात केलेला नाही. सर्वच बाबी ह्या अर्थपूर्ण आहेत. त्यामुळे कुठेही सिनेमा वेगळ्या लाईनवर अजिबात जात नाही. तंतोतंत सगळ्या गोष्टी जुळून आल्या आहेत. कौटुंबिक कथानक असूनही मस्त विनोदी पद्धतीने त्याने हा सिनेमा रेखाटला आहे.
या सिनेमातील आशय, कथानक अनेकदा आपण वेगवेगळ्या सिनेमांमध्ये पाहिलं असेल. पण यात कथानकाला उगाच कुठेही ठिगळं लावलेली दिसत नाही. ओळखीचं कथानक असूनही सुरूवातीपासून ते आपल्याला गुंतवून ठेवतं, आपलं मनोरंजन करतं. हळवा विषय असल्याने मुद्दाम इमोशनल गोष्टी अधिक प्रमाणात पेरण्यात आलेल्या नाहीत. खूपच साधी, सोपी आणि अर्थपूर्ण अशी ही कथा आहे.
सचिन खेडेकर यांची या सिनेमात मुख्य भूमिका असून त्यांची या सिनेमावर छाप आहे. संपूर्ण सिनेमा त्यांनी त्यांच्या अभिनय कौशल्याच्या जोरावर आपल्या खांद्यावर घेतला आहे. आतापर्यंतच्या त्यांच्या भूमिकांपेक्षा या सिनेमातील भूमिका खूप वेगळी आणि स्टायलिश आहे. त्यासोबतच पुष्कराज चिरपुटकर याने या सिनेमातील कॉमेडी भूमिका एकहाती पेलली आहे. त्याचे विनोद सिनेमाला कुठेही तुटू देत नाही. सचिन खेडेकर आणि पुष्कराजचं ट्यूनिंग परफेक्ट जमून आलं आहे. सर्वांनीच त्यांच्या भूमिका खूप चांगल्या निभावल्या आहेत.
दिग्दर्शनासोबतच संवाद आणि पटकथा लेखनाची जबाबदारीही निपुण धर्माधिकारी यानेच निभावली आहे. निपुण आधीपासूनच एक चांगला लेखक म्हणूण इंडस्ट्रीत लोकप्रिय आहे. या सिनेमाच्या प्लस पॉईंटपैकी एक म्हणजे या सिनेमाचं लेखन म्हणता येईल. सगळेच संवाद अर्थपूर्ण झाले आहेत. तर पटकथेचा ग्राफ जराही ढासळला नाहीये. लेखनासाठी निपुणला १०० पैकी १०० गुण द्यावे लागतील.
‘बापजन्म’ हा सुरूवातीपासून आपल्या पडद्यावरील कथेत घेऊन जातो. त्या कथेशी आपण कनेक्ट होतो. त्यातूनही महत्वाची गोष्ट की, जसजशी कथा पुढे कथेत अनेक इंटरेस्टींग आणि आश्चर्यकारक गोष्टी पुढे येतात. त्यामुळे सिनेमातील मजा आणखीन वाढते. सिनेमा संपल्यावर थिएटरबाहेर पडताना अजिबात मनात काही प्रश्न नसतात. एक आनंद देणारी कलाकृती पाहिल्याचं समाधान आणि ही कथा अशीही मांडली जाऊ शकते, याचं वाटणारं अप्रुप.