मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणाचं जे महानाट्य सुरू आहे ते सगळ्यांनाच विचार करायला लावणारं आहे. महाराष्ट्रातील राजकारणी सत्ता मिळवण्यासाठी कोणत्या थराला जात आहेत? असा विचार प्रत्येकाच्या मनात आहे. लोकशाहीमध्ये मतदाराच्या मतांना महत्व न देता राजकारणी आपलं राजकारण करत आहेत. असं असताना अभिनेता जावेद जाफरी याने प्रश्नार्थक विधान केलं आहे.
23 नोव्हेंबरची सकाळ उजाडली ती एका राजकीय भूकंपानेच. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासोबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पण हे सरकार बहुमत सिद्ध न झाल्याने अवघ्या साडे तीन दिवसांतच गळून पडलं. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मु्ख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
An unanswerable question pic.twitter.com/5iXT6MK3Zy
— Jaaved Jaaferi (@jaavedjaaferi) November 22, 2019
अभिनेता आणि डान्सर जावेद जाफरी यांनी प्रश्नार्थक विधान केलं आहे. ट्विटकरून जावेदने सगळ्या नेत्यांना एक प्रश्न विचारला आहे. 'निवडणुकीनंतर मी माझं मत बदलू शकत नाही, तर निवडणुकीनंतर नेते पक्ष कसा बदलू शकतात?'
जावेद जाफरीने ट्विट करून आपलं मत व्यक्त केलं आहे. त्याच्या या ट्विटवर अनेकांनी प्रतिक्रिया देऊन आपलं समर्थन दिलं आहे. अनेकांनी जावेद जाफरीचा प्रश्न योग्य असल्याचं म्हटलं आहे. अनेकांनी हे ट्विट रिट्विट करून आपण या मताशी सहमत असल्याचं म्हटलं आहे. तसेच काहींनी यावर कमेंट करत तुम्ही बरोबर बोलताय, पण लोकांना हे समजण्याइतपत शहाणपण नाही. जावेदचं हे ट्विट 22 नोव्हेंबरचं असून आजही नेटीझन्स त्यावर प्रतिक्रिया देत आहेत.