नवी दिल्ली : 'खतरो के खिलाडी ९' चा फायनलिस्ट आदित्य नारायणने आपलं प्रेम जाहीर केलंय. श्वेता अग्रवालसोबतच्या नात्याबद्दल तो खुल्या व्यासपिठावर बोललाय. ही जोडी मागच्या दहा वर्षांपासून एकत्र असून आता विवाहबंधनात अडकणार आहे. पण एंटरटेन्मेंट होस्ट आदित्य नारायणला आर्थिक चणचण जाणवू लागली आहे.
इंडीयन आयडॉल होस्ट आदित्य नारायणने आपल्या बॅंक अकाऊंटमध्ये केवळ १८ हजार रुपये शिल्लक असल्याचे सांगितले. असेच सुरु राहीले तर कठीण होईल आणि खर्च भागवण्यासाठी बाईक विकावी लागेल असेही तो म्हणाला.
सरकारने लॉकडाऊन आणखी वाढवला असता तर लोक भुकेने मेले असते. माझा सर्व बॅलेन्स संपला. म्यूच्यूअल फंड्समध्ये जितके पैसे गुंतवले होते ते मला पुन्हा काढून घ्यावे लागल्याचे ते म्हणाले.
एक वर्षापर्यंत काही काम करु शकणार नाही असं कोणाला वाटलं नव्हतं. कोणीचं असं प्लानिंग करुन ठेवत नाही. तुम्ही जोपर्यंत अरबपती नसाल तर तुमच्याकडे काही मार्ग नाही. माझ्या खात्यात १८ हजार आहेत. जर मी ऑक्टोबरपर्यंत काम सुरु केलं नाही तर माझ्याकडे पैसेच नसतील. मला बाईक विकावी लागेल. अशावेळी काही कठोर निर्णय तुम्हाला घ्यावे लागतात असे तो सांगतो.