Indian Singer Goes Grocery Shopping: सध्या सोशल मीडियावर विकी कौशल (Vicky Kaushal) आणि सारा अली खानच्या (Sara Ali Khan) आगामी जरा हटके जरा बचके (Zara Hatka Zara Bachke) चित्रपटातील फिर ऑप क्या चाहिऐ (Phir Aur Kya Chahiye) गाणं चांगलेच व्हायरल होत आहे. गायक अरिजीत सिंगने (Arijit Singh) हे गाणं गायलं आहे. तसं अगदी ब्रेकअप झालेलं असो किंवा पहिल्यांदा प्रेमात पडलेले प्रेमीयुगूल असो सर्वांच्याच भावना अरिजीतची गाणी अगदी छानपणे व्यक्त करतात. अरिजीतच्या आवाजातील भावना या ओथंबून वाहत असतात असं त्याचे चाहते सांगतात. सध्याच्या घडीला देशातील सर्वात लोकप्रिय पार्श्वगायकांच्या यादीत आघाडीवर असलेला अरिजीत प्रत्यक्ष आयुष्यातही फारच साधेपणे राहतो. अरिजीतचं चाहत्यांप्रतीचं प्रेम, त्याची साधी रहाणी आणि डाऊन टू अर्थ वागणं चाहत्यांना आपलंसं करुन घेतो. त्याचा साधेपणा दाखवणारे अनेक व्हिडीओ आणि पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.
अरिजीतच्या गायन क्षेत्रातील कारकिर्दीला मोठ्या मंचावर पहिला ब्रेक मिळाला तो इंडियन आयडलपासून. ही स्पर्धा त्याला जिंकता आली नाही. तो या स्पर्धेत रनरअप राहिला. मात्र इंडियन आयडलपासून सुरु झालेला अरिजीतचा प्रवास आज देशातील आघाडीचा पार्श्वगायक होण्यापर्यंत पोहोचला आहे. असं असलं तरी अरिजीत आपलं मूळ आणि साधा स्वभाव विरसलेला नाही. अरिजीत आजही त्यांच्या मूळ घरी म्हणजेच पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमधील जुन्या घरातच राहतो. अगदी सर्वसामान्यांप्रमाणे तो आयुष्य जगतो. इंटरनेटवर अरिजीतच्या साधेपणाचं दर्शन घडवणारा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
अरिजीतचा हा व्हिडीओ एका चिंचोळ्या गल्लीत शूट करण्यात आला आहे. या व्हिडीओत अगदी साधे कपडे परिधान करुन अरिजीत हातात कापडी पिशवी घेऊन किराणा माल विकत घेण्यासाठी जाताना दिसत आहे. पिशवी घेऊन आपल्या स्कूटरकडे अरिजीत चालत जातो, स्कूटर सुरु करतो आणि निघून जाताना दिसतो. बंगली भाषेत तो स्थानिकांशी संवाद साधत असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल होत असून त्यावर अनेकांनी प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. लोकांमध्ये मिळून मिसळून राहणारा देशातील आघाडीचा गायक असं म्हण अनेकांनी अरिजीतचं कौतुक केलं आहे.
अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट करुन आपण अरिजीतचे किती मोठे चाहते आहोत हे सांगितलं आहे. काहींनी इतर कलाकार आपल्या चाहत्यांना नको तशी वागणूक देत असताना अरिजीत एवढ्या साधेपणाने राहतो याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं आहे. तर काहींनी एवढा मोठा झाल्यानंतरही अरिजीत आपलं मूळ विरसलेला नाही असं म्हणत त्याचं कौतुक केलं आहे. अरिजीतची आई ही मूळची पश्चिम बंगालची होती तर त्याचे वडील कक्कड सिंग हे शिख आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याच्या काळात अरिजीतने पुन्हा मुंबईमधून आपल्या मूळ घरी शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून तो पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्येच राहतोय.