मुंबई : बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीसह त्याच्या संपूर्ण कुटुंबाला क्वारंटाईन करण्यात आलं आहे. नवाजुद्दीन सिद्दिकी मुंबईहून उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगर जिल्ह्यातील बुढाणा येथे आपल्या घरी पोहचला आहे. आपल्या घरी पोहचल्यानंतर त्याला कुटुंबासह पुढील 14 दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आलं आहे. नवाजुद्दीनसह त्याच्या संपूर्ण कुटुंबाचं मेडिकल स्क्रिनिंग करण्यात आलं. या सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.
महाराष्ट्र सरकारकडून परवानगी पत्र घेतल्यानंतर नवाजुद्दीन 15 मे रोजी आपल्या घरी पोहचला आहे. त्यानंतर आता त्याला कुटुंबासह घरातच 25 मेपर्यंत क्वारंटाईनमध्ये राहण्यास सांगितलं आहे.
मुंबईहून यूपीतील बुढाणा येथे तो आपल्या गाडीने पोहचला. या प्रवासात त्याच्यासोबत त्याची आई, भाऊ आणि वहिनी हेदेखील होते. मीडियाशी बोलताना नवाजुद्दीनने, या संपूर्ण प्रवासात त्यांना रस्त्यावरुन जाताना 25 वेळा मेडिकल स्क्रिनिंग करावं लागलं, असल्याचं सांगितलं.
बुढाणा येथील पोलीस स्टेशन अधिकारी कुशलपाल सिंह यांनी, आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी नवाजुद्दीनच्या घराची पाहणी करुन त्यांना 14 दिवसांसाठी क्वारंटाईनमध्ये राहण्यास सांगितलं असल्याची माहिती दिली.
दरम्यान, नवाजुद्दीन लवकरच 'घूमकेतू'मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'घूमकेतू'मध्ये नवाजुद्दीनशिवाय अनुराग कश्यप, ईला अरुण, स्वानंद किरकिरे, रघुबीर यादव, रागिनी खन्ना प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. या फिल्मचं 22 मे रोजी झी 5 (Zee5) वर स्ट्रिमिंग होणार आहे.