मुंबई : अभिनेता शाहिद कपूर लवकरच 'कबीर सिंग' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'कबीर सिंग'चीच भूमिका साकारणाऱ्या शाहिदचा चित्रपटातील अनोखा अंदाज नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. शाहिदच्या या भूमिकेविषयी चाहत्यांमध्येही बरंच कुतूहल पाहायला मिळथ असून, हा 'कबीर सिंग' बॉक्स ऑफिसवर गाजण्याची चिन्हं आहेत. कारण, खुद्द शाहिदनेही या भूमिकेसाठी प्रचंड मेहनत घेतली आहे.
'मुंबई मिरर'शी संवाद साधताना शाहिदने या चित्रपटासाठी नेमकी कोणत्या प्रकारची मेहनत घेतली होती यावरून पडदा उचलला. 'कबीर सिंग'च्या भूमिकेत जीवंतपणा आणण्यासाठी आणि ती भूमिका अधिक प्रभावीपणे सादर करण्यासाठी शाहिद एका क्षणाला एकूण २० सिगारेट ओढू लागला होता. याविषयीच सांगत शाहिद म्हणाला, 'मी कधीच धुम्रपान करत नव्हतो. पण, मी साकारत असणाऱ्या भूमिकेची ही गरज होती. मुख्य भूमिकेत असणारं पात्र त्याच्यातील संताप आणि उद्रेक बाहेर काढण्यासाठी म्हणून धुम्रपान करताना दाखवायचं होतं. हे सारंकाही माझ्यासाठी तितकंसं सोपं नव्हतं. पण, एक वेळ अशी आली जेव्हा एका दिवसाला मी २० सिगारेट ओढू लागलो होतो.'
चित्रीकरण आणि केवळ भूमिकेची गरज म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणावर धुम्रपान केल्यानंतर घरी परतण्याच्या वेळी जवळपास दोन तासांहून अधिक वेळ शाहिद अंघोळ करत असे. सिगारेटच्या दुर्गंधीचा मिशा आणि झैन यांना त्रास होऊ नये यासाठी शाहिद ही सारी काळजी घेत होता. आपल्या कामाप्रती असणारी त्याची निष्ठा आणि कुटुंबाप्रती असणारी जबाबदारी या दोन्ही गोष्टी त्याच्या या वर्णुकीतून अधोरेखित होत आहेत. काही दिवसांपूर्वीच शाहिदच्या कबीर सिंग या आगामी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. 'अर्जुन रेड्डी' या तेलुगू चित्रपटाचा हा रिमेक असून, आता प्रेक्षकांना तो भावतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.