मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानू यांनी काही दिवसांपूर्वीच ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. समीर भोजवानी या बिल्डकडून येणाऱ्या धमक्यांविषयी चर्चा करण्यासाठी आणि मदत मिळवण्यासाठी म्हणून त्यांनी मोदींकडे धाव घेतली.
मंळवारी मोदी मुंबई- पुणे दौऱ्यावर होते, पण बानू आणि त्यांची भेट काही शक्य झाली नाही. पण, आता हे प्रकरण अधिकच गंभीर झालं असून गरज पडल्यास आपण स्वत: दिल्लीला जाऊन पंतप्रधानांची भेट घेणार असल्याची ठाम भूमिका त्यांनी मांडली. भोजवानी हा दिलीप कुमार यांच्या प्रकृती अस्वास्थ्याचा गैरफायदा घेत असल्याचा आरोपही बानी यांनी 'एएनआय' या वृत्तसंस्थेशी बोलताना केला.
वांद्रे येथील पाली हिल परिसरात असणाऱ्या बंगल्यावर मालकी हक्क सांगणाऱ्या बिल्डर, भूखंड फाफिया समीर भोजवानी याची पोलीस कोठडीतून सुटका झाल्याची बानू यांनी अधोरेखित करत संबंधित प्रकरणी सोशल मीडियाच्या माध्यमातून मदत मागितली होती. दरम्यान, आता या मुदद्यावर आपण शांत राहणार नसून, थेट दिल्लीत जाऊन मोदींची भेट घेणार असल्याचं स्पष्ट केलं.
दरम्यान, सोमवारी भूखंड वादाप्रकरणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सायरा बानू आणि दिलीप कुमार यांची मदत करण्याचं आश्वासन दिलं होतं. पण, आता आश्वासनांपलीकडे जाऊन आपल्याला मदत मिळावी याच भूमिकेवर त्या ठाम आहेत. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांच्या दरबारी बानू यांना मदत मिळणार की त्यांना दिल्ली गाठावी लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.