मुंबई: चौकटीबाहेरचं कथानक आणि तितकच आव्हानात्मक पात्र, भूमिका या साऱ्याची जबाबदारी अगदी सराईताप्रमाणे घेणाऱ्या कलाकारांच्या यादीलीत एक नाव म्हमजे स्मिता पाटील. अभिनयापासून ते साध्याभोळ्या पण तितक्याच सुरेख अशा रुपापर्यंत प्रत्येक गोष्टीचा विषय निघाला की, दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांचा उल्लेख होतोच.
आपल्या चित्रपट कारकिर्दीत मैलाचा दगड ठरतील अशा भूमिकांना न्याय देणाऱ्या या अभिनेत्रीची आज जयंती. या अभिनेत्रीच्या जयंतीनिमित्त त्यांच्या आठवणी जागवत आहेत.
कलाविश्वात जवळपास अवघ्या दहा वर्षांच्या कारकिर्दीत स्मिता पाटील यांनी साधारण ८० चित्रपटांमध्ये काम केलं. ज्यात त्यांच्या वाट्याला खऱ्या अर्थाने यश आलं.
कारकिर्दीत सुरुवातीच्या चार वर्षांमध्येच त्यांनी राष्ट्रीय पुरस्कारालाही गवसणी घातली होती.
विविध पुरस्करांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्याचं सुख काय असतं हे स्मिता पाटील यांनी खऱ्या अर्थाने अनुभवलं असं म्हणणं वावगं ठरणार नाही.
रुपेरी पडद्यावर त्यांची कारकिर्द ज्याप्रमाणे प्रकाशझोतात राहिली, त्याचप्रमाणे त्यांच्या खासगी आयुष्यानेही अनेकांचीच मनं जिंकली.
राज बब्बर यांच्यासी विवाहबंधनात अडकणाऱ्या स्मिता पाटील यांच्यावर काही प्रमाणात टीकाही झाली. पण, तो टप्पाही त्यांनी पार केला.
आयुष्य कधी कोणतं वळण घेईल याची काहीच कल्पना नसते, स्मिता पाटील यांच्या बाबतीतही असंच काहीसं घडल्याचं पाहायला मिळालं. मुलगा प्रतीक याच्या जन्मानंतर काही दिवसांनीच त्यांची तब्येत बिघडू लागली.
पाहता पाहता शरीरातील एक एका अवयवानेही या देखण्या अभिनेत्रीची साथ सोडण्यास सुरुवात केली.
अखेर १३ डिसेंबर १९८६ ला अभिनय क्षेत्राचं हे स्मित हरपलं. स्मिता पाटील यांनी अखेरचा श्वास घेतला.
वयाच्या ३१ व्या वर्षी जगाचा निरोप घेणाऱ्या स्मिता पाटील यांच्या अंतिम प्रवासासाठी त्यांना एखाद्या रुपवान सौभाग्यवतीप्रमाणे सजवण्यात आलं होतं. त्यांचा पेहरावही तसाच होता.
मेकअप आर्टीस्ट दीपक सावंत यांनी एका मुलाखतीत याविषयीचा खुलासा केला होता. निधनानंतरही आपल्यावा सुहासिनीप्रमाणे सजवावं, अशी इच्छा खुद्द स्मिता पाटील यांनीच व्यक्त केली होती.
राज कुमार झोपलेले असतेवेळी दीपक त्यांचा मेकअप करत असल्याचं स्मिता पाटील यांनी पाहिलं. त्यांचा हा अंदाज त्यांना इतका आवडला की त्यांनी दीपक सावंत यांच्याकडे अशाच पद्धतीने मेकअप करण्याची इच्छा व्यक्त केली.
ही इच्छा ऐकून दीपक सावंत यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण, पाटील यांनी त्यांच्याकडून वचनच घेतलं.
कोणाला पुसटशी कल्पनाही नव्हती की, ही त्यांची अखेरची इच्छा ठरेल. स्मिता पाटील यांच्या निधनानंतर त्यांच्या पार्थिवाला एखाद्या नववधूप्रमाणे सजवलं होतं. निधनानंतर स्मिता पाटील यांची ती इच्छा अखेर पूर्ण झाली होती. पण, ती अभिनेत्री मात्र सर्वांचाच कायमचा निरोप घेऊन गेली होती.