मुंबई :
दिग्दर्शन- अमर कौशिक
निर्मिती- दिनेश विजन
कलाकार- आयुष्मान खुराना, यामी गौतम, भूमी पेडणेकर आणि इतर....
हवेच्या लाटांवर उडणारे मुलायम केस याच हवेमुळे उडाले आणि लपवलेलं टक्कल सर्वांसमोर आलं तर......? पुढे नेमकं काय होईल, याची प्रत्येकाची कल्पना प्रत्येकाने केलेलीच बरी. अशाच एका कल्पनेचा आधार घेत काही दैनंदिन जीवनाचे दाखले देत एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अभिनेता आयुष्यमान खुराना याची मुख्य भूमिकार असणारा हा चित्रपट आहे, 'बाला'.
ऐन तारुण्यात केस गळती सुरु झाल्यानंतर, जेव्हा आपण मस्करी आणि नको त्या चर्चांचा विषय होऊन जातो तेव्हा कसं वाटतं, याविषयीचं चित्र आयुष्मानने त्याच्या अभिनयातून सर्वांपुढे आणलं आहे. कमी वयातच टक्कल पडलेल्या आणि अनेकदा ज्यांच्यावर विनोद केले गेले आहेत अशा व्यक्तींच्या कधीही न व्यक्त केलेल्या भावनांना 'बाला'ने जणू वाचा फोडली आहे. फक्त मध्यवर्ती भूमिकेत असणारा आयुष्मानच नव्हे, तर चित्रपटातल प्रत्येक कलाकार त्यांच्या वाट्याला आलेली भूमिका तितक्याच ताकदीने निभावून जातं.
अमर कौशिक दिग्दर्शित आणि नीरेन भट्ट लिखित 'बाला'मध्ये बालमुकुंद शुक्ला म्हणजेच बाला हा त्याच्या जबरदस्त अंदाजामुळे ओळखला जात असतो. शालेय जीवनात मुलींमध्ये आपल्या हटके अंदाजामुळे प्रसिद्ध असणारा आणि मजामस्करी करणारा बाला पुढे जाऊन कधी स्वत:च या मजामस्तीचा शिकार होऊ लागतो हे चित्रपटाच पाहण्याजोगं आहे.
ऐन पंचवीशीत केसगळतीची सुरुवात होऊन त्यावर सतत काहीतरी उपाय शोधण्यात व्यग्र असणारा 'बाला' पाहताना चेहऱ्यावर नकळत हसू येतं. त्याच्या भूमिकेत असणारी सहजता ही त्याला सर्वसामान्य तरीही उठावदार करुन जाते. त्यातच सावळ्या वर्णामुळे लोकांचे टोमणे ऐकणारी लतिका (भूमी)सुद्धा बालाची अधूनमधून खिल्ली उडवत असते. त्याच्या जीवनात खरी बहर येते ती म्हणजे एका खऱ्याखुऱ्या परिमुळे म्हणजेच परी मिश्रा अर्थात यामी गौतम हिच्यामुळे.
कानपूरच्या स्थानिक भाषेची जोड घेत लिहिण्यात आलेले संवाद हे पहिल्यापासून चित्रपटात रंगत आणतात. त्यातच आयुष्यमानने साकारलेला 'बाला' चित्रपट पाहताना अशी काही जादू करतो, की त्यावर नजरच हटत नाही. पहिल्या दृश्यापासून अखेरच्या दृश्यापर्यंत 'बाला' कुठेही रटाळ वाटत नाही. संवाद, दिग्दर्शन, संगीत, पटकथा या सर्वत बाबतील तो उजवा ठरतो.
काही प्रसंग हे एखाद्या व्यक्तीच्या जीवनावर कशा प्रकारे बदल करुन जाऊ शकतात, त्याला अनेकदा कशा प्रकारे नकारात्मकेत्या दुनियेचंही दर्शन घडवून आणतात हेच 'बाला'तून साकारण्यात आलं आहे. त्यामुळे विनोदी अंदाजात अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावर भाष्य करणारा 'बाला' पाहाच.