मुंबई : कलाविश्वात कोणा एका कलाकाराच्या नावाला कधी पसंती मिळेल आणि तो कलाकार कधी प्रेक्षकांच्या मनात राज्य करेल हे काहीच सांगता येत नाही. अशातच अपेक्षित चित्रपटांना यश न मिळणं ही बाब त्या कलाकारांच्या कारकिर्दीवर परिणामही करुन जाते. याविषयीच अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिनेही तिचे विचार सर्वांसमोर ठेवले आहेत. 'पीटीआय' या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना तिने ही भूमिका स्पष्ट केली.
अपयशाच्या काळातही आपल्या करिअरवर लक्ष केंद्रीत करत नेहमीच सकारात्मक दृष्टीकोन ठेवण्याला तिने प्राधान्य दिलं आहे. 'माझ्य़ासाठी प्रत्येक चित्रपट हा तितकाच महत्त्वाचा आहे. प्रत्येक चित्रपटाने चांगलीच कामगिरी करावी अशीच माझी इच्छा असते. माझ्या सलग दोन चित्रपटांना अपयशाचा सामना करावा लागल, ही अत्यंत दु:खदायक बाब आहे. पण, मी मात्र कायमच आशावादी आहे. नेहमीच चांगलं काम कसं करत रहावं, यावरच मी कायम भर देते', असं ती म्हणाली.
बॉक्स ऑफिसची गणितं ही प्रत्येकासाठी वेगळी असतात. त्याविषयीच अधिक माहिती देत, बॉक्स ऑफिस ही एक अशी बाब आहे, जी माझ्या नियंत्रणात नाही असं स्पष्ट केलं. एक अभिनेत्री म्हणून, आपल्या कौशल्यावर आपण नियंत्रण ठेवू शकतो. त्यामुळे ज्या गोष्टी आपल्या ताब्यात नाहीत त्यांच्याविषयी विचार करण्यात वेळ वाया घालवणाऱ्यांपैकी सोनाक्षी नाही. अनुभवांतूनच माणूस शिकतो, असं म्हणत आणि याच मार्गावर चालत तिने आतापर्यंत या क्षेत्रातील कामगिरी सुरू ठेवली आहे.
'कलंक' या चित्रपटाच्या वाट्याला आलेल्या अपयशानंतर ती या अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावर संवाद साधत होती. सोनाक्षी येत्या काळात 'मिशन मंगल' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातून अक्षय कुमार, तापसी पन्नू, विद्या बालन हे कलाकारही झळकणार आहेत. शिवाय येत्या काळात ती, 'दबंग ३' या चित्रपटातूनही पुन्हा एकदा सलमान खानसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.