मुंबई :
दिग्दर्शक - हितेश केवल्य
निर्मिती- आनंद एल. राय, भूषण कुमार, हिमांशू शर्मा, क्रिष्ण कुमार
कलाकार- आयुष्मान खुराना, जितेंद्र कुमार (जितू), सुनिता राजवर, नीना गुप्ता, गजराज राव आणि इतर....
आयुष्मान खुराना आणि 'पिचर्स' या वेब सीरिजमुळे कलाविश्वात अतिशय लोकप्रिय झालेल्या जितू या दोन्ही कलाकारांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीचा तडका देत दिग्दर्शक हितेश केवल्यने 'शुभ मंगल ज्यादा सावधान' Shubh Mangal Zyada Saavdhan हा चित्रपट प्रेक्षकांपुढे सादर केला आहे. समलैंगिक संबंधांवर प्रकाशझोत टाकत सुशिक्षित वर्गातही या विषयाबाबत किती न्यूनगंड आहेत हे या चित्रपटातून अतिशय प्रभावीपणे दाखवण्यात आलं आहे.
आयुष्यमान Ayushmann Khurrana आणि जितेंद्र jitu या दोघांनीही साकारलेली 'गे' पात्र दाखवत असताना दिग्दर्शकाने कोणत्याही पात्राला बायकी स्वरुपात सादर करण्याचा प्रयत्नही केलेला नाही, ही बाब अतिशय प्रशंसनीय. बऱ्याच बॉलिवूड चित्रपटांमध्ये 'गे' पात्र दाखवताना कोणा एका पात्रामध्ये असा अंदाज दाखवला जात होता. पण, मुळात तसं नसल्याचाच समज या चित्रपटाच्या निमित्ताने मोडून काढण्यात आला आहे. आता त्यात आयुष्यमानच्या नाकात नथनी कशासाठी, असा प्रश्न तुम्हाला पडत असल्यास चित्रपट पाहिल्यानंतर हा हटके लूक त्याला खऱ्या अर्थाने शोभत असल्याचीच प्रतिक्रिया तुम्ही द्याल.
आयुष्मान (कार्तिक) आणि जितेंद्र (अमन) यांच्यामध्ये असणाऱ्या प्रेमाच्या नात्यात आयुष्मान तुलनेने जास्त व्यक्त होणारा आणि थेट वक्तव्य करणारा. त्यातच 'अमन'च्या आईवडिलांच्या भूमिकेत दिसणाऱ्या गजराज राव आणि नीना गुप्ता यांच्या भूमिकाही विशेष लक्ष वेधून जातात. त्यांच्यात होणारे प्रासंगिक विनोद चित्रपटाचं कथानक पुढे न्यायला मदतीचे ठरतात.
शाहरुखच्या 'स्वदेस'मध्ये झळकलेली अभिनेत्री आज एक 'बिझनेस वुमन'
आपल्या मुलाला कसला भलताच 'आजार' असल्याचं समजून पूजाअर्चा करण्यापासून एका दुसऱ्याच मुलीशी त्याचं लग्न ठरवण्यापर्यंतचा विचार अमनचे आईवडिल करतात. यामध्ये अमनची होणारी घुसमट आणि चित्रपटातील संवाद, कलाकारांचा अभिनय याची सांगड घातली गेल्यामुळे 'शुभ मंगल ज्यादा सावधान' अतिशय प्रभावीपणे उलग़डू लागतो.
चित्रपाटातील विनोद हे 'गे' प्रेमसंबंध, समलैंगिकता यांवर नसून समाजाच्या बुळटलेल्या विचारसरणीवर आहेत. त्यामुळे याच विचारसणरीवर केलेली ही उपहासात्मक आणि विचार करण्यास भाग पाडणारी विनोदी शैली चित्रपटाच्या जमेची बाजू ठरत आहे.
चित्रपटाचा पूर्वार्ध जितका रंजक आणि गुंतवून ठेवणारा ठरतो, तितकाच त्याचा उत्तरार्ध मात्र हलकासा भरकटताना दिसतो. परिणामी पटकथेवर असणारी पकड हलकीशी सैल पडते. नीना गुप्ता आणि गजराज राव यांनी साकारलेल्या भूमिका अतिशय दमदार कामगिरी करतात. तर, अभिनेता आयुष्मान खुराना पुन्हा एकदा त्याच्या अभिनय कौशल्याची छाप सोडून जात आहे. जसं क्रिकेटच्या मैदानात 'धोनी है तो मुमकीन है...', असं म्हटलं जातं त्यचप्रमाणे आता येत्या काळात चित्रपटांमध्ये 'आयुष्मान है तो मुमकीन है...' असं म्हणावं लागलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. समलैंगिक प्रेमसंबंधांवर आजवर बऱ्याच चित्रपटांमधून भाष्य करण्यात आलं आहे. पण, 'शुभ मंगल ज्यादा सावधान'च्या निमित्ताने ही नाती आणखी सोप्या आणि सुयोग्य पद्धतीने समोर आली आहेत हेच खरं.
या चित्रपटाला 'झी२४तास'कडून साडेतीन स्टार्स.