Bollywood First Item Girl : असं म्हणतात की वाईट वेळ कधीच पूर्वसंकेत देऊन येत नाही. हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये बऱ्याच कलाकारांनी हे दिवस पाहिले. त्यातलंच एक नाव होतं कुक्कू मोरे. 'मी कधी अन्नाचं महत्त्वं जाणलं नाही. दररोद 5 स्टार हॉटेलातून जेवण मागवून मित्रांना जेवू घालत होते. काही उरलं तर ते टाकून देत होती. ही त्याच कर्माची फळं आहेत की आज माझी अन्नान्न दशा झाली आहे. मी रस्त्यावर पडलेल्या भाज्या वेचते आणि त्याच आणून शिजवते, खाते', याच शब्दाच आपल्या जीवनातील आव्हानात्मक काळाचं वर्णन कुक्कू मोरे यांनी तबस्सूम यांच्यासोबतच्या एका मुलाखतपर कार्यक्रमात केलं.
हिंदी सिनेसृष्टीत 40, 60 च्या दशकांदरम्यान असा एकही चित्रपट नव्हता ज्यामध्ये कुक्कू मोरे यांचं गाणं, डान्स नसे. हिंदी सिनेविश्वातील पहिली आयटम गर्ल म्हणून या अभिनेत्रीला बरीच प्रसिद्धी मिळाली. त्या काळात एका गाण्यासाठी त्यांना 6000 रुपये इतकं मानधन मिळत होतं. हा आकडा इतका मोठा होता की, चित्रपटातील मध्यवर्ती भूमिकेत झळकणाऱ्या अभिनेत्रीलाही तितके पैसे दिले जात नव्हते.
असं म्हणतात की कुक्कू आलिशान घरात राहत होत्या. त्यांच्याकडे 8000 ड्रेस, 5000 सँडल, 3 लक्झरी कार होत्या. दर दिवशी त्या पंचतारांकित हॉटेलांमधून जेवण मागवत. पण, हे दिवस असे काही फिरले की कुक्कूनं दारिद्र्यसुद्धा पाहिलं. कधीकाळी चित्रपट वर्तुळात पार्टीमध्ये कुक्कूची हजेरी म्हणजेच खरी रंगत असं समीकरण होतं. पण, हीच अभिनेत्री अखेरच्या दिवसात मात्र एकटी पडली होती.
1928 मध्ये या अभिनेत्रीचा जन्म एका अँग्लो इंडियन कुटुंबात झाला. त्यांच्या कुटुंबाविषयी फार माहिती उपलब्ध नसली तरीही कोलकाता किंवा कराचीमध्ये त्यांचा जन्म झाल्याचं म्हटलं जातं. 'अरब का सितारा' या 1946 मधील चित्रपटातून त्यांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. त्यांचं नृत्यकौशल्य आणि अदा पाहून त्या काळात प्रत्येक दिग्दर्शकाची पहिली पसंती होती कुक्कू.
'हलचल', 'आवारा', 'आरजू', 'लैला मजनू' अशा चित्रपटांमध्येही त्या झळकल्या होत्या. तेव्हाची आघाडीची अभिनेत्री रुबी मेअर्सही मानधन म्हणून 5000 रुपये घेत होती त्याहीपेक्षा जास्त मानधन कुक्कूला मिळत होतं. जेव्हा हेलेन आणि त्यांची आई रंगूनमधून भारतात आल्या तेव्हा त्यांना कुक्कूनंच आधार दिला. हेलेनला प्रशिक्षण देत कुक्कूनच या विश्वास पदार्पणाची संधी दिली. गरजवंत कलाकारांना काम देण्यासाठी कायमच कुक्कू पुढाकार घेत होत्या. त्यांनी आपल्या गरीबीला कायमच दोष दिला. जेव्हा आपल्याकडे संपत्ती होती तेव्हा आपण तिला महत्त्वं दिलं नाही पण, खरा वाईट काळ तेव्हा सुरु झाला जेव्हा आपण अन्नाचा अनादर करण्यास सुरुवात केली असंच त्या कायम म्हणत.
1963 नंतर कुक्कू प्रकाशझोतापासून दूर झाल्या. 1980 मध्ये त्यांना कर्करोगाचं निदान झालं पण, तोवर उपचारासाठी त्यांच्याकडे काहीचत पैसे उरले नाहीत. 1981 मध्ये त्यांना उपचारासाठी टाटा रुग्णालयात दाखल करण्यात आलं जिथं त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काहीजणांनी एकत्र येऊन त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले पण, ही बातमी कलाविश्वापर्यंत पोहोचूनही या लोकप्रिय चेहऱ्याला निरोप देण्यासाठी मात्र कोणीही पोहोचलं नव्हतं. हा एका पर्वाचा एकाकी अन् वेदनादायी अंत होता.