राज्यसभेत भाषण करताना काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे (Mallikarjun Kharge) चांगलेच संतापल्याचं पाहायला मिळालं. भाषण करत असताना भाजपा खासदार आणि माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांचे सुपूत्र नीरज शेखर (Neeraj Shekhar) अडचण निर्माण करत असल्याने मल्लिकार्जून खरगे त्यांच्यावर संतापले. आपण त्यांच्या वडिलांचे समकालीन होतो आणि त्यांनी त्यांना लहानपणी पाहिलं होतं याची आठवण मल्लिकार्जून खरगे यांनी त्यांना करुन दिली. भाजप खासदाराला कडक शब्दांत सुनावत त्यांनी त्यांना बसण्यास सांगितलं.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेदरम्यान काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने सोमवारी वरिष्ठ सभागृहाला संबोधित केले. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणीवर ते बोलत होते. यावेली नीरज शेखर यांनी त्यांना अडवलं.
"मी तुझ्या वडिलांचा सहकारी होतो. तू काय बोलतोस? तुला घेऊन फिरलो आहे. शांतपणे खाली बस," अशा शब्दांत खरगे यांनी नीरज कुमार यांना सुनावलं.
"तेरा बाप भी इधर मेरे साथ था। तू क्या बात करता है?"
खड़गे ने बीजेपी नेता नीरज शेखर को करारा जवाब दिया @kharge pic.twitter.com/EmBVOjVp9R
— Dushyant Naagar (@DushyantNaagar) February 3, 2025
यानंतर सभागृहात एकच गोंधळ उडाला आणि अध्यक्ष जगदीप धनखर यांनी दोन्ही बाजूंना शांत राहण्याचं आवाहन केलं. "चंद्रशेखरजी हे या देशाने आजवर पाहिलेल्या सर्वात मोठ्या नेत्यांपैकी एक आहेत. चंद्रशेखरजींबद्दल देशात असलेला आदर अतुलनीय आहे," असं सांगत त्यांनी खरगे यांना माजी पंतप्रधानांचा संदर्भ मागे घेण्याची विनंती केली.
खरगे आणि शेखर यांनी आपण जेव्हाही भेटतो तेव्हा ते एकमेकांशी सौहार्दपूर्ण असतो असं सांगितलं. खरगे यांनी सांगितलं की, त्यांना आणि दिवंगत चंद्रशेखर यांना एकत्र अटक करण्यात आली होती. "म्हणूनच मी म्हणालो तुझे वडील माझे सोबती आहेत. आणि तू उठलास जणू...," असं खरगे म्हणाले.
अध्यक्ष म्हणाले, "तुम्ही 'आपके बाप' म्हणत आहात, आम्ही हे अभिव्यक्ती प्रमाणित करू शकतो का? तुम्ही दुसऱ्या सन्माननीय सदस्याला 'आपके बाप' म्हणत आहात, आम्हाला चंद्रशेखरजींबद्दल आदर असणे आवश्यक आहे. कृपया माघार घ्या."
यावर खरगे यांनी कोणाचाही अपमान करण्याची सवय नाही असं उत्तर दिलं. त्यानंतर त्यांनी भाजपावर माजी पंतप्रधान दिवंगत मनमोहन सिंग यांचा अपमान केल्याचा आरोप केला. "कोणी म्हणाले की ते आंघोळ करताना रेनकोट घालतात, कोणी म्हणालं ते बोलत नाहीत, तर कोणी म्हणाले की ते सरकार चालवू शकत नाहीत. त्यांनी अशी अपमानास्पद टिप्पणी केली, पण त्यांनी ते सहन केले आणि देशहितासाठी गप्प बसले. त्यांना मौनी बाबा म्हटलं गेलं. लोकांचा अपमान करण्याची ही सवय त्यांची आहे, अपमान सहन करणारे आम्हीच आहोत," असं ते पुढे म्हणाले.
समाजवादी पक्षाचे माजी खासदार नीरज शेखर 2019 मध्ये भाजपमध्ये सामील झाले. त्यांचे वडील चंद्रशेखर हे देशाच्या इतिहासातील सर्वात उंच समाजवादी नेत्यांमध्ये गणले जातात आणि त्यांनी ऑक्टोबर 1990 ते जून 1991 पर्यंत सहा महिने पंतप्रधान म्हणून काम केले.