Abhishek Bachchan Birthday: बॉलिवूड सिनेसृष्टीतील लोकप्रिय आणि दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चनने सुद्धा चित्रपटांमधून आपली ओळख निर्माण केली आहे. कित्येक वर्षांपासून बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये काम करत अभिषेकने बरेच हीट चित्रपट दिले आहेत. 2000 साली 'रिफ्यूजी' या चित्रपटातून अभिषेकने सिनेसृष्टीत पदार्पण केले. आज अभिषेक बच्चनचा 49 वा वाढदिवस आहे. याचंच औचित्य साधून, जाणून घेऊया, अभिषेक बच्चनच्या काही खास गोष्टी.
अभिषेक बच्चनच्या अभिनय कार्यक्षेत्रात त्याला बऱ्याच चढ-उतारांचा सामना करावा लागला. अभिषेक दिलेल्या चित्रपटांपैकी काही चित्रपट हे बॉक्स ऑफिसवर हीट ठरले तर काहींना हवे तसे यश मिळाले नाही. या चढ-उतारांव्यतिरिक्त अभिषेकने आपला मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. त्याच्या प्रत्येक चित्रपटांवर चाहत्यांचा अतिशय चांगला प्रतिसाद पाहायला मिळतो. अभिषेकच्या 'गुरु', 'पा' आणि नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'वॉंट टू टॉक' या चित्रपटांना प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली. आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिषेकची संपत्ती नेमकी किती? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
अभिषेक बच्चनच्या नेट वर्थबद्दल बोलायचे झाल्यास, GQ च्या रिपोर्टनुसार, अभिषेक 280 कोटींच्या संपत्तीचा मालक आहे. फक्त चित्रपटच नव्हे, तर बऱ्याच ब्रँड आणि जाहिरातींमधून तो बक्कळ कमाई करत असतो. इतकेच नाही तर अभिषेक बच्चन प्रो कबड्डी लीग मधील 'जयपूर पिंक पँथर्स' या संघाचा मालक आहे आणि आता तो AB Corp. एक प्रोडक्शन हाऊसही सांभाळत आहे.
काही बॉलिवूड कालाकारांप्रमाणेच अभिषेक बच्चनही रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करतो. 2020 ते 2024 या काळात त्याने आपले वडील अमिताभ बच्चन यांच्यासोबत 220 कोटी रुपयांची मालमत्ता खरेदी केली होती. याव्यतिरिक्त, रिपोर्ट्सनुसार, अलीकडेच अभिषेकने 24.95 कोटी रुपयांमध्ये 10 अपार्टमेंट्स खरेदी केले आहेत.
अभिषेक बच्चनने 'तेरा जादू चल गया', 'देश', 'हां मैंने भी प्यार किया', 'शरारत', 'मुंबई से आया मेरा दोस्त', 'कुछ न कहो', 'जमीन', 'रन', 'युवा', 'धूम', 'रक्त', 'नाच', 'सरकार', 'बंटी और बबली', 'दस', 'सलाम नमस्ते', 'कभी अलविदा न कहना', 'उमराव जान' अशा कित्येक चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत. नुकतंच, अभिषेकच्या 'वॉंट टू टॉक' या चित्रपटातील भूमिकेने प्रेक्षकांचे खिळवून ठेवले. या चित्रपटात अभिषेकने अर्जुनची भूमिका साकारली आहे. आता अभिषेक बच्चन 'हाऊसफुल 5' आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवरील 'बी हॅप्पी' या चित्रपटात झळकणार आहे.