मुंबई : प्रेमात उध्वस्त झालेल्या 'कबीर सिंग'ची प्रेम कहाणी चाहत्यांना कामालीची भावली आहे. दिवसागणिक चित्रपटाची लोकप्रियता वाढताना दिसत आहे. प्रेक्षकांनी चित्रपटाला चांगलेच डोक्यावर घेतले आहे. प्रदर्शनानंतर पहिल्याच दिवशी २० कोटींचा गल्ला जमवणारा 'कबीर सिंह' १०० कोटींच्या घरात पोहोचला आहे. चित्रपटाच्या कथेला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद तर दिलाच आहे, पण चित्रपटातील गाण्यांनी तरूणांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.
शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने पहिल्याच दिवशी २० कोटी रूपयांचा गल्ला जमवला. सलग पाचव्या दिवशी चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करताना दिसत आहे. पाच दिवसांची कमाई पाहात चित्रपटाचे ९३ कोंटीचा गल्ला जमवला आहे. तर सहाव्या दिवशी 'कबीर सिंग' १०० कोटींच्या घरात पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही.
'कबीर सिंग' शाहिदच्या करियरला कलाटणी देणारा चित्रपट ठरला आहे. आतापर्यंत चित्रपटाची कामगिरी पाहता शाहिदने त्याच्या कुटुंबासह हे यश साजरा केले आहे. पत्नी मीरा कपूर आणि भाऊ इशान खट्टरसह शाहिदने हा आनंद साजरा केला. यासंबंधीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
'अर्जुन रेड्डी' या तेलुगू चित्रपटाचा रिमेक असणाऱ्या 'कबीर सिंग'मध्ये शाहिद मध्यवर्ती भूमिकेत झळकत आहे. कियारा अडवाणी त्याच्यासोबत चित्रपटातून स्क्रीन शेअर करत आहे. प्रेमाची उध्वस्त कहाणी बॉक्स ऑफिसवर गाजत आहे.