मुंबई : 'महंमद द मेसेंजर ऑफ गॉड' हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचं चित्र आहे. या चित्रपटाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरील प्रसारणासाठी बंदी घालणयासाठी रजा अकादमी या संस्थेने राज्याच्या सायबर विभागाकडे तक्रार अर्ज केला आहे. तर यासंदर्भात माहिती तंत्रज्ञान कायद्यातील तरतुदीनुसार चित्रपट प्रसारणावर बंदी घालावी, असं पत्र केंद्र शासनास पाठवलं असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
माजिद माजिदी दिग्दर्शित हा चित्रपट प्रेषित मोहम्मद यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटासाठी ए. आर रहमान यांनी संगीत दिलं आहे. रझा अकादमीने सरकारला पत्र लिहून, या चित्रपटामुळे धार्मिक भावना दुखावल्या जात असल्याचं सांगितलं. 'महंमद द मेसेंजर ऑफ गॉड' चित्रपट २१ जुलैला ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. परंतु त्यावर बंदी घालावी, असं विनंती पत्र रजा अकादमीने राज्याच्या सायबर विभागास पाठविलं होतं. त्याशिवाय केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विभागाला, पत्र पाठवून या चित्रपटाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रसारणासाठी बंदी घालावी, शिवाय युट्यूब, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, व्हाट्सऍप, टेलिग्राम आणि स्नॅपचॅट यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर हा चित्रपट प्रसारित न करण्याबाबत सूचना देण्यात याव्यात, अशी मागणी पत्रात केली आहे.
Raza Academy Demand To Stop The Distribution Of The Flim Muhammad The Messenger Of God Based On The Holy Prophet Of Islam#BoycottFilmOnProphet pic.twitter.com/YBqGH1PE3k
— Raza Academy (@razaacademyho) July 12, 2020
महाराष्ट्र सायबर विभागाने देखील अशा प्रकारची विनंती केंद्र शासनाला केली असून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी ही बंदी घालण्यात येण्यासाठीचं विनंतीपत्र दिलं असल्याची माहिती अनिल देशमुख यांनी दिली आहे.