Amol Kolhe : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकांमुळे तमाम मराठी माणसांच्या हृदयात आदराचं स्थान पटकावणारे ख्यातनाम अभिनेते, शिरूरचे खासदार आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी अभिनयातून संन्यास घेण्याचे संकेत दिलेत. 'झी 24 तास'च्या निवडणूक यात्रा कार्यक्रमात दिलेल्या खास मुलाखतीत अमोल कोल्हेंनी ही महत्त्वाची घोषणा केली. शिरूरच्या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढची 5 वर्षं अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेणार असल्याचं कोल्हेंनी स्पष्ट केलं. दरम्यान, अमोल कोल्हेंच्या अभिनय क्षेत्रावरून अजित पवार, आढळरावांकडून सडकून टीका होतेय. तुम्हाला कार्यसम्राट खासदार पाहिजे की नटसम्राट खासदार पाहिजे? असा सवालही केला जातोय.
राजकीय परिस्थितीवर भाष्य करत असताना खासदार अमोल कोल्हे यांना त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील विरामाविषयीचा प्रश्न विचारण्यात आला. याचा अर्थ तुम्ही ब्रेक घेणार आहात असं आता समजायचं का आम्ही? त्याचं उत्तर देत ते म्हणाले, ''नाही, नक्कीच माझ्या उत्तरातून तुम्हाला हे कळलं असेल की हे सगळे प्रोजेक्ट्स मार्गी लावायचे असतील, तर मग अभिनय क्षेत्राला खूप जास्त वेळ मिळणं हे फार अवघड आहे. त्याचमुळे हे प्राधान्य ठरवावं लागेल कारण मायबाप जनतेनं ठरवलंय की या पद्धतीनं पुन्हा विश्वास माझ्यावर ठेवायचा आणि त्यासाठी ब्रेक घ्यावा लागला तरी मला वाटतं की हे प्रश्न आधी मार्गी लागणं. शिरुर मतदार संघातील, महाराष्ट्राच्या संदर्भातले, माझं जास्त प्राधान्य या गोष्टीला आहे."
पुढे अमोल कोल्हे यांना विचारण्यात आलं की आपण बोलू शकतो की पुढचे काही दिवस अमोल कोल्हे हे स्क्रिनवर दिसणार नाहीत? तुम्ही हा ब्रेक काही दिवसांसाठी किंवा वर्षांसाठी घेत आहात? त्याविषयी बोलताना अमोल कोल्हे म्हणाले, "नाही. यामध्ये कसं होतं की हे फूलटाईम प्रोफेशन आहे. मी जसं म्हणालो, की यामध्ये काही गोष्टी आपण शिकतो. त्या पद्धतीनं मी हे जे पाहिलेलं आहे आणि त्यामुळे मला वाटतं की अभिनय क्षेत्रातून ब्रेकजरी घेतला तरी आता शिरुर लोकसभा मतदार संघाचे प्रश्न सोडवणं याला माझं प्राधान्य राहिल. त्यामुळे अभिनय क्षेत्रातून तो ब्रेक घ्यावा लागली तरी त्याला माझी काहीच हरकत नाही."
काही दिवसांसाठी अमोल कोल्हे यांनी अभिनयातून ब्रेक घेतला असं म्हणता येईल. त्यावर अमोल कोल्हे म्हणाले, "काही दिवसांसाठी नाही तर 5 वर्षांसाठी म्हणावं लागेल. कारण ही पूर्ण कमिटमेंट आहे. ही पूर्ण कमिटमेंट शिरुर लोकसभा मतदार संघाशी आहे आणि या पूर्ण कमिटमेंटमुळे ती कमिटमेंट करावीच लागेल. यामध्ये अपवाद फक्त छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा विचार पोहोचवणं हे जे एक प्राधान्य असेल. हा अपवाद सोडला तर बाकी कुठेही तुम्ही मला स्क्रिनवर पाहाल असं मला वाटत नाही."