मुंबई : अनेकदा एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर कितीही आनंद असला तरीही ती व्यक्ती पूर्णपणे आनंदी असेलच असं नाही. मुख्य म्हणजे आनंदाची आणि सुखाची परिभाष्या प्रत्येच्या दृष्टीनं वेगळी असते. या सर्व गोष्टी निगडीत असतात मानसिक आरोग्याशी. पण, आजही अनेकजणांमध्ये हा न्यूनगंडाचाच विषय आहे. असं नेमकं का, याचं उत्तर अद्यापही मिळालेलं नाही. पण, मानसिक स्थैर्यासाठी प्रयत्नशील राहणाऱ्या अनेकांनी मात्र हा मुद्दा तितक्याच सहजपणे सर्वसामान्यांना पटवून देण्याचं सत्र सुरु ठेवलं आहे.
कलाकार मंडळीही यात मागे नाहीत. मग ते नैराश्याचा सामना करणं असो किंवा आणखी काही. अनेक लोकप्रिय सेलिब्रिटी अगदी मोकळेपणानं याबाबत सर्वांसमोर व्यक्त झाले आहेत. यातच आता अभिनेता आमिर खान, याच्या मुलीचंही नाव जोडलं गेलं आहे. सोशल मीडियावर आमिरच्या मुलीनं म्हणजेच इरानं एक व्हिडिओ पोस्ट करत यामध्ये आपण नैराश्याचा सामना करत असल्याचं सांगितलं.
'मी गेल्या चार वर्षांपासून नैराश्याचा समाना करत आहे. त्यासाठी मी अनेक डॉक्टरांकडेही गेले. मी क्लिनिकली डिप्रेस्ड आहे. पण, आता मी अगदी व्यवस्थित आहे. मागील एक वर्षापासून मला मानसिक आरोग्यासाठी काहीतरी करायचं होतं. पण, नेमकं काय हे मात्र मला कळत नव्हतं. तेव्हाच माझ्या या प्रवासावर तुम्हालाही घेऊन जावं, पाहू काय होतं ते असा विचार माझ्या मनात आला', असं इरा म्हणाली.
इराचा हा व्हिडिओ समोर येताच इतक्या गंभीर मुद्द्यावर तिच्या खुलेपणानं बोलण्याची अनेकांनीच दाद दिली. व्हिडिओ पोस्ट करतही तिनं एक सुरेख असा संदेश दिला. आयुष्याकडे पाहण्याचा नेमका दृष्टीकोन नेमका कसा असावा हे तिनं या कॅप्शनमधून सांगितलं.