मुंबई : बॉलिवूड स्टार्स आणि क्रिकेटचा खूप जवळचा संबंध आहे. असे अनेक स्टार्स आहेत ज्यांना क्रिकेट पाहायला आवडतं. तर अनेक सेलिब्रिटीजकडे इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये मालकीही आहे. प्रीती झिंटा, शाहरुख खान आणि शिल्पा शेट्टी यांनी आयपीएल टीम विकत घेतल्यानंतर आता असं वृत्त आहे की, दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग देखील लवकरच टीम विकत घेतील.
दीपिका-रणवीर आयपीएल टीम विकत घेतील
एका मीडिया रिपोर्ट्सच्या हवाल्याने म्हटलं आहे की, 'रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणची बॉलिवूड जोडीची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सादर केलेल्या 2 नवीन आयपीएल संघांपैकी एक खरेदी करण्याची इच्छा आहे.' जर असं झालं, तर 2022च्या आयपीएलमध्ये आपण रणवीर-दीपिकाला क्रिकेटच्या मैदानाच्या स्टँडमध्येही पाहू शकतो.
शाहरुखची टीम आधीच आहे
नवीन आयपीएल संघाची लिलाव प्रक्रिया सोमवारी (25 ऑक्टोबर) दुबईत होणार आहे. प्रीती झिंटा आणि शाहरुख खानचे संघ आयपीएलमध्ये आधीच उपस्थित आहेत. 2008 मध्ये आयपीएल सुरू झाल्यापासून शाहरुख खान कोलकाता नाईट रायडर्स संघाचा मालक आहे. रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण दोघंही त्यांच्या करिअरच्या शिखरावर आहेत.
दीपिका-रणवीर सुपरहिट जोडी
दोन्ही अभिनेत्यांचे अनेक बॅक टू बॅक चित्रपट सुपरहिट झाले आहेत आणि आता अलीकडेच रणवीर सिंगनेही टीव्हीवर पदार्पण केलं आहे. त्याचबरोबर दीपिका पदुकोण मोठ्या पडद्यावर सातत्याने चमकत असते. दीपिका पदुकोणच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर ती लवकरच रणवीर सिंगसोबत '83' चित्रपटात दिसणार आहे.