मुंबई : मुंबईत गेल्या चार दिवसांमध्ये झालेल्या दमदार पावसामुळे लोकांचे घरातून बाहेर पडणे कठीण झाले होते. पण या भयंकर पावसातही जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर यांनी धडक सिनेमाच्या प्रमोशनमध्ये कोणतीही कसर ठेवली नाही. पावसात मस्ती करत या दोन्ही स्टार्सने सिनेमाचे प्रमोशन करत केले.
जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर धडकच्या प्रमोशनसाठी एका एफम चॅनलच्या स्टुडिओत गेले होते. पण मुंबईतील पावसामुळे मंदावलेल्या वाहनांच्या गतीतही जान्हवी आणि ईशान मात्र एकदम वेळेत पोहचले. रस्त्यावर गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असताना त्यातून वाट काढत पावसात मज्जामस्ती करत जान्हवी-ईशान रेडिओ चॅनलपर्यंत पोहचले. त्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. पहा हा मजेशीर व्हिडिओ...
काही दिवसांपूर्वी जान्हवी, वडील बोनी कपूर आणि बहिण खूशी कपूरसोबत धडक सिनेमाच्या यशासाठी तिरुपती बालाजी मंदिरात दर्शनासाठी गेली होती. जान्हवीची आई आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची तिरुपती बालाजींवर विशेष श्रद्धा होती. यामुळेच जान्हवीने देखील धडकच्या प्रदर्शनापूर्वी तिरुपती बालाजींचे दर्शन घेतले.
शशांक खेतान दिग्दर्शित धडक हा सिनेमा २० जुलैला प्रदर्शित होणार आहे. सिनेमाचे निर्मिती धर्मा प्रॉडक्शन आणि झी स्टुडिओ यांनी एकत्रितपणे केली आहे. धडक मधील जान्हवी कपूरचा अभिनय पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या श्रीदेवींच्या मुलीचा अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.