मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणच्या '83' सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर बोलबाला आहे. हा चित्रपट कपिल देव यांचा बायोपिक आहे. ज्यामध्ये त्यांच्या 1983 च्या विश्वचषक विजेतेपदाचे क्षणही पडद्यावर मांडण्यात आले आहेत. पण तुम्हाला माहित आहे का? की, कपिल देवची मुलगी अमिया देवने '83' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.
'83' चित्रपटातून कपिल देव यांची मुलगी अमियाने बॉलिवूडमध्ये पहिली इनिंग सुरू केली आहे. '83' चित्रपटात कपिल देव यांची मुलगी अमियाची भूमिका महत्त्वाची आहे. पण 83 या चित्रपटात अमियाने अभिनय केला नसून सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे. कपिल देव यांच्या मुलीने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून बॉलिवूडमध्ये पहिलं पाऊल ठेवलं आहे.
'83' चित्रपटाचे दिग्दर्शक कबीर खान यांनी ही माहिती दिली आहे. एका मुलाखतीमध्ये बोलताना ते म्हणाले की, ''कपिल देव यांची मुलगी अमिया हिने त्यांना चित्रपटासाठी मदत केली आहे. या बायोग्राफिकल ड्रामाच्या अनेक महत्त्वाच्या आणि कठीण भागांमध्ये अमिया असल्याने त्यांची खूप मदत झाली असंही ते पुढे म्हणाले. विशेषत: कपिल देव यांच्याशी संबंधित सीनमध्ये अमियाने संपूर्ण टीमला मार्गदर्शन केलं. कबीर खान पुढे म्हणाले की, जेव्हा-जेव्हा कपिल देवशी संबंधित काहीतरी करायचं असायचं तेव्हा संपूर्ण टीम अमियाला पुढे करायची.
कपिल आणि रोमीच्या लग्नानंतर सुमारे 14 वर्षांनी जन्मलेल्या अमिया देवचा जन्म 1996 मध्ये झाला. अमिया देवने तिचं शालेय शिक्षण गुडगावमध्ये पूर्ण केलं. त्यानंतर तिने यूकेच्या सेंट अँड्र्यूज विद्यापीठातून पुढील शिक्षण पूर्ण केलं. रिपोर्टनुसार, अमिया 2019 मध्ये कबीर खानच्या क्रूमध्ये सामील झाला होती.