मुंबई : नेहमी सामाजिक कार्यात सक्रीय असणाऱ्या सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी सध्या सबंध महाराष्ट्रभरात कोविड पॉझिटिव्ह असलेल्या व्यक्तींबरोबर होत असणाऱ्या भेदभावपूर्ण व्यवहाराविरुद्ध “#विचारबदला” या व्हिडिओच्या माध्यमातून आवाज उठवला आहे.
कोविड पॉझिटिव्ह असलेल्या किंवा संक्रमण संशयित असलेल्या व्यक्ती प्रति भेदभाव दर्शविण्याच्या घटना वाढत चाललेल्या आहेत. नुकतीच मुंबईच्या लालबागमधील एक घटना उघडकीस आली आहे, जिथे एका मराठी वृत्तपत्रासह काम करणाऱ्या २४ वर्षीय फोटो जर्नलिस्टला संस्थात्मक विलगीकरण केंद्रातून घरी परत आल्यावर त्याच्याच शेजार्यांनी त्याला शिवीगाळ केली. या पत्रकाराची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आलेली नव्हती .
Posted by SonaliKulkarni on Sunday, May 3, 2020
मात्र या फोटो जर्नलिस्टचा संपर्क अन्य दोन कोविड पॉझिटिव्ह असणाऱ्या फोटो जर्नलिस्ट यांच्याशी झाला असल्याने मुंबई महानगरपालिकेद्वारे २० एप्रिलला दक्षता म्हणून त्याला विलगीकरण केंद्रात पाठवण्यात आले होते. केवळ अकारण भीतीने या फोटो जर्नलिस्टशी गैरवर्तन झाल्याची ही घटना समोर आली आहे. शेजाऱ्यांनी केलेल्या गैरवर्तनामुळे त्याला दादरच्या एका संस्थात्मक संगरोध केंद्रात परत जाण्यास भाग पडले.एवढेच नव्हे तर, कोविड पॉझिटिव्ह असणाऱ्या व्यक्तींना त्यांचे नाव व व्हिडिओ व्हॉट्सअॅप ग्रुपवरून प्रसारित केल्या जात असल्याने अश्या व्यक्तिंना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
आरोग्य व मानसशास्त्रज्ञ यांच्याद्वारे कोविड पोसिटीव्ह असणाऱ्या व्यक्ती व त्यांच्या कुटुंबीयांवर अशा गैरव्यवहारचा दीर्घ काळासाठी मानसिक दुष्परिणाम होऊ शकतो अशी चिंता मोठ्या प्रमाणावर व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा या भेदभावपूर्ण व्यवहाराला अधोरेखित करत जनतेने “कोविड पोसिटीव्ह असणाऱ्या व्यक्ती व त्यांच्या कुटुंबीयांबरोबर अमानवी वर्तवणूक करू नये” असे आवाहन महाराष्ट्राच्या जनतेला केले आहे.
संबंधित ७० सेकंदांचा हा व्हिडिओ मुंबईच्या वातावरण व झटका या एकत्र काम करणाऱ्या सामाजिक संस्थांनी जनजागृतीच्या हेतूने तयार केला आहे. टर्टल ऑन अ हॅमॉक चे गीता सिंग व अविनाश सिंग यांच्या संकल्पनेतून या चित्रफितीचे अनावरण झाले आहे.
या व्हिडिओच्या माध्यामातून अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी कोविड पॉझिटिव्ह असणाऱ्या व्यक्तींचा व त्यांच्या गोपनीयतेचा आदर करावा व त्यांना सन्मानपूर्वक वागणूक द्यावी असा आग्रह व्यक्त केला आहे. सोनाली कुलकर्णी म्हणाल्या, “कोविड पॉझिटिव्ह संक्रमित असलेल्या व्यक्तींना कशाची भीती आहे? दुर्दैवाची बाब अशी आहे की, आज काल काही लोकांसाठी कोविड पॉझिटिव्ह असणं हे कुठल्या हि गुन्ह्यापेक्षा कमी नाही. पण हे चुकीचं आहे, आणि आपण हि मानसिकता बदललीच पाहिजे. "एकमेकांशी हात मिळवणे गरजेचे नाही पण, कोविड पॉझिटिव्ह असणाऱ्या लोकांबद्दल पसरवल्या जाणाऱ्या अफवा व त्यांच्याबद्दल निर्माण केलेली सामाजिक कलंकत्वाची प्रतिमा तोडणे गरजेचे आहे. "मिठी मारू नका, शेक हॅन्ड हि करू नका....पण कोरोनाला हरवण्यासाठी योग्य विचार नक्की करा," असा संदेश देत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी या व्हिडिओचा समारोप करतात.