मुंबई : प्रत्येकाच्या आयुष्यात आनंदी होण्यासाठी अनेक प्रसंग, घटना कारणीभूत ठरतात. प्रत्येक वेळी एखादी मोठी गोष्टच आनंद देऊन जाते असं नाही. तर आनंदाच्या या मोहरा अगदी छोट्या घटना आणि प्रसंगांतूनही मिळवता येतात. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला सध्या याचीच प्रचिती येत आहे.
सध्या कोरोना व्हायरसमुळे लागू असणाऱ्या होम क्वारंटाईनध्ये असूनही सोनालीला तिच्या आनंदासाठी एक अत्यंत महत्त्वाचं कारण गवसलं आहे. निमित्त ठरतंय ते म्हणजे तिला आलेलीएक खास पत्रवजा नोट. अमुक एका खास व्यक्तीने स्वत:च्या अक्षरात लिहिलेली ही नोट (पत्र) मिळालं बस्स... आता अजून काय हवं आयुष्यात? असं कॅप्शन लिहित तिने सोशल मीडियावर एक पोस्ट केली.
सोनालीने केलेली ही पोस्ट पाहून लक्षात येत आहे की, खुद्द बिग बी आणि महानायक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमिताभ बच्चन यांनीच तिला हे पत्र पाठवलं आहे. Coronavirus कोरोना व्हायरसशी लढा देण्यासाठी नागरिकांना घरातच राहण्याचं आवाहन करण्यासाठी म्हणून कलाविश्वातील विविधभाषी कलाकारांनी एकत्र येऊन घरबसल्याच 'फॅमिली' नावाचा एक लघुपट साकारला.
रजनीकांत, अमिताभ बच्चन, चिरंजीवी, मोहनलाल, ममूथी असे दिग्गज आणि रणबीर, आलिया, दिलजीत दोसांज, प्रियांका चोप्रा अशा कलाकारांच्या साथीने मराठी चित्रपटसृष्टीकडून सोनाली या लघुपटात झळकली. मराठी कलाविश्वाचं जणू तिनं एक प्रकारे प्रतिनिधीत्वंच केलं. तिच्या या सहभागासाठी आणि अनोख्या उपक्रमातील योगदानासाठी अमिताभ बच्चन यांनी तिच्याप्रती आभार व्यक्त केले आहेत. अर्थातच एखाद्या कलाकाराला जेव्हा महानायकाचं पत्र येतं तेव्हा जी भावना असते काहीशी तशीच भावना किंबहुना त्याहूनही बऱ्याच भावना सोनालीने या एता पत्राच्या निमित्ताने अनुभवल्या. ज्या तिने सोशल मीडियाच्या माध्यमातूनही व्यक्त केल्या.