मुंबई : सेलिब्रिटींच्या रुपाचा, त्यांच्या खासगी आयुष्याचा चाहत्यांना कायमच हेवा वाटत असतो. पण, याच सेलिब्रिटींच्या जीवनातही अशी काही वादळं आलेली असतात जी कित्येकदा या झगमगाटाच्या आड दडलेली असतात. मुख्य म्हणजे असे प्रसंग जेव्हा सर्वांसमोर येता तेव्हा कित्येकांना धक्काच बसतो.
मराठी चित्रपटसृष्टीत 'अप्सरा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि आपल्या रुपाने अनेकांनाच घायाळ करणाऱ्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने तिच्याजीवनातील एक असंच वळण सर्वांपुढे आणलं आहे. 'ही तुमची अप्सरा नाही', असं लिहित खुद्द सोनालीनेच तिचा एक फोटो काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर शेअर केला. ज्यामध्ये चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचा मेकअप नसून, खरी सोनाली नेमकी आहे तरी कोण हेच स्पष्टपणे पाहता येत आहे.
'एक अभिनेत्री म्हणून नव्हे, तर एक सर्वसामान्य मुलगी म्हणूनच सोनाली या पोस्टमधून सर्वांच्या भेटीला आली आहे. 'जन्मल्यापासूनच माझी त्वचा अतिशय सुंदर होती. पण, नटरंगनंतर माझ्या त्वचेला ऍक्नेचा त्रास होण्यास सुरुवात झाली. इतर मुलींना होते तशीच. त्यादरम्यान मी प्रचंड ताण- तणाव, कामाच मिळणाऱ्या नकारांचा सामना केला. काही चित्रपट गमावलेही. यातच मला नैराश्यही आलं होतं.', असं सोनालीने लिहिलं.
अतिशय कठीण प्रसंगातून जात असताना आपल्यापुढे उभ्या राहिलेल्या या अडचणीवर तिने स्वत:च तोडगा काढला. ज्यावेळी तुम्ही स्वत:चा आहे त्याच अवस्थेत स्वीकार करु लागता तेव्हात तुम्ही परिस्थितीवरही मात करु लागता. त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर असणाऱ्या त्रुटी आहेत तशा स्वीकारा, स्वत:वर प्रेम करा असा संदेश तिने दिला.
मुख्य म्हणजे सोनालीचा हा संदेश फक्त चेहऱ्यावरील सौंदर्यासाठीच लागू आहे असं नाही. तर, प्रत्येकाना सर्वस्वी स्वत:ला स्वीकारलं तरच संकटांवर मात करण्याचं बळ तुम्हाला मिळेल ही बाबही त्यातून अधोरेखित झाली.