Ratris Khel Chale 2 : 'अण्णा'- 'शेवंता'ची अशीही केमिस्ट्री...

नजरेचा कटाक्षच सारं काही सांगून जातो.

Updated: Feb 12, 2020, 10:28 AM IST
Ratris Khel Chale 2 : 'अण्णा'- 'शेवंता'ची अशीही केमिस्ट्री...  title=
'रात्रीस खेळ चाले २'

मुंबई : मराठी मालिका विश्वात 'अण्णा नाईक' आणि 'शेवंता' ही दोन नावं बरीच चर्चेत आहेत. 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेच्या दुसऱ्या पर्वात या दोन पात्रांना मिळणारी लोकप्रियता शब्दांतही व्यक्त न करता येण्याजोगीच आहे. सध्या ही मालिका अत्यंत रंजक अशा वळणावर आली आहे. अर्थात मालिकेच्या कथानकासोबत 'अण्णा' आणि 'शेवंता'ची अफलातून केमिस्ट्रीसुद्धा याला कारणीभूत आहे. 

'झी मराठी'कडून 'रात्रीस खेळ चाले २' या मालिकेतील एक व्हिडिओ नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे. ज्यामध्ये विहिरीवर पाणी नेण्यासाठी म्हणून आलेल्या शेवंतावर नजर जाताच अण्णा नाईकांनी तिच्यावर टाकलेला नजरेचा कटाक्षच सारंकाही सांगून जात आहे. 

'शेवंता' आणि 'अण्णांच्या' या केमिस्ट्रीला मालिकेच्या पार्श्वसंगीतानेही खऱ्या अर्थाने चार चाँद लावले आहेत. मालिकेचा संपूर्ण भाग तुम्हाला पाहता आला नसेल, तर ही एक झलकही सध्या पुरेशी ठरेल असं म्हणायला हरकत नाही. अण्णा- शेवंताच्या या केमिस्ट्रीवर नेटकऱ्यांनीही अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर आणि अभिनेता माधव अभ्यंकर यांनी उभी केलेली ही पात्र प्रेक्षकांच्या विशेष पसंतीची ठरत आहेत. मालिकेच्या सुरुवातीपासूनच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचणाऱ्या या पात्रांकडे पाहता आता पुढे रात्रीस खेळ चाले २ला कोणतं वळण मिळणार हे जाणून घेण्यासाठीच चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. 

पाहा : देवाब्राह्मणाच्या नव्हे, संविधानाच्या साक्षीने अभिनेत्याने बांधली लग्नगाठ

कोकणातील एका कुटुंबात घडणाऱ्या घटना, परिस्थिती आणि प्रसंगांमुळे त्या कुटुंबावर ओढावणारी संकटं आणि एक गूढ रहस्य या साऱ्याभोवती 'रात्रीस खेळ चाले २' या मालिकेचं कथानक फिरताना दाखवण्यात आलं आहे. भाषेचा गोडवा, गावाकडचं चित्रीकरण आणि कलाकारांचा दमदार अभिनय यांच्या बळावर या मालिकेला फार कमी कालावधीतच प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे.