मुंबई : कलाविश्वात सध्याच्या घडीला चर्चेत असणाऱ्या #MeToo चळवळीला दर दिवसाआड एक नवं वळण मिळत आहे. अनेक अभिनेत्री मोठ्या धाडसाने त्यांच्यासोबत झालेल्या गैरव्यवहाराविषयी मोकळेपणाने बोलत असून, इतरही कलाकार मंडळी त्यांना पाठिंबा देत आहेत.
करिब करिब सिंगल या चित्रपटातून हिंदी चित्रपट विश्वात पदार्पण करणाऱ्या दाक्षिणात्य अभिनेत्री पार्वती हिनेसुद्धा अशा अभिनेत्री, महिलांच्या धाडसाचं कौतुक केलं आहे.
मामि मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली असतानाच तिने हे वक्तव्य केलं. यावेळी तिने स्वत:वर ओढावलेल्या अशाच एका वाईट प्रसंगाविषयीसुद्धा वक्तव्य केल्याचं पाहायला मिळालं.
'ते सारंकाही मी अगदीच अल्पवयीन असताना झालं होतं. जवळपास १७ वर्षांनंतर माझ्यासोबत नेमकं काय झालं होतं, हे माझ्या लक्षात आलेलं. माझं लैंगिक शोषण झालं तेव्हा मी अगदी तीन-चार वर्षांची असेन. याविषयी खुलेपणाने बोलण्यासही मला १२ वर्षे लागली होती. त्यावेळी मी कोणाला काहीच सांगितलं नव्हतं, पण माझं लैंगिक शोषण झालं होतं', असं ती म्हणाली.
आपण हे सर्व काही एक महिला असल्यामुळेच म्हणत आहोत, असं नाही हेसुद्धा तिने स्पष्ट केलं. 'सर्वप्रथम मी एक व्यक्ती असून माझ्यावर दुसरे टॅग हे नंतर लावण्यात आले आहेत', असं म्हणत त्या गोष्टीचा स्वीकार करणं हे आपल्यासाठी कठिण असल्याचं तिने सांगितलं.
पार्वती तिरुवत कोट्टूवता ही मल्याळम चित्रपटसृष्टीत असणाऱ्या 'वुमन इन सिनेमा कलेक्टीव्ह'ची सदस्य आहे. लैंगिक शोषणाच्या मुद्द्यावर ज्याप्रमाणे बी टाऊनमध्ये काही महत्त्वाचे निर्णय अगदी तातडीने घेण्यात आले, अगदी त्याचप्रमाणे मल्याळम चित्रपटसृष्टही असंच व्हावं, हा मानस तिने बाळगला आहे.