Dombivli Illegal Construction: डोंबिवलीमधील 6500 कुटुंब बेघर होणार असल्याची माहिती समोर आली आहे. महारेराच्या माध्यमातून करण्यात सर्वात मोठा घोटाळा उघडकीस आल्यानंतर येत्या काही दिवसांत डोंबिवलीत 65 बेकायदा इमरती जमीदोस्त केल्या जाणार आहेत. या बेकायदा इमारती पाडण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले असून घरं जमीनदोस्त झाल्यानंतर इथं राहणाऱ्या 6500 कुटुंबांवर बेघर होण्याची वेळ येणार आहे. याच मुद्द्यावरुन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पक्षाने थेट भारतीय जनता पार्टी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबरच त्यांच्या खासदारपुत्रावर निशाणा साधला आहे.
ठाकरेंच्या पक्षाचे प्रवक्ते तसेच राज्यसभा खासदार संजय राऊत यांना पत्रकारांनी डोंबिवलीमधील या बेकायदेशीर 65 इमारतींबद्दल प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना राऊतांनी, "प्रश्न असा आहे की सरकार काय करतं? जनतेच्या भावनेतून हे सरकार आलेलं आहे असं देवेंद्र फडणवीस सांगतात. अजित पवार सांगतात. एकनाथ शिंदे सांगतात. डोंबिवली मध्ये 62 इमारतींवर बुलडोझर चालवला किमान साडेसहा ते सात हजार कुटुंब रस्त्यावर आले याची जबाबदारी कोणत्या सरकार घेणार त्या भागाचे आमदार रवींद्र चव्हाण आहेत. बिल्डरने बनावट कागदपत्रे तयार करून राजकीय पाठबळ मिळून शासकीय यंत्रणा ताब्यात घेतली. या घरांवर नागरिकांना कर्ज मिळाले आहेत. 6500 कुटुंबं एका क्षणात रस्त्यावर येता त्याची वेदना सरकारला होत नाही का?" असा सवाल उपस्थित केला आहे.
"गौतम अदानी, त्याच्या प्रकल्पासाठी इतके मेहनत केली जाते तर या सरकारने डोंबिवलीच्या साडेसहा हजार लोकांवर मेहरबानी केली असती तरी लोक बेघर झाली नसती," असा टोला राऊतांनी लगावला. "रवींद्र चव्हाण पळून जात आहेत लोकांना भेटी देत नाहीत हा काय प्रकार आहे?" असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे. "तुम्ही मस्साजोग सरपंचांचा विषय घेत आहात दुसरीकडे 6000 लोकांना बुलडोझर खाली चिरडून मारलं दोन्ही ठिकाणी मृत्यूच आहे, मरण आहे," असंही राऊत म्हणाले. तसेच पुढे बोलताना, "6 हजार 500 घराच्या प्रकरणांमध्ये कोण राजीनामा घेणार रवींद्र चव्हाण या भागामध्ये अनेक वर्ष आमदार आहेत, ते राजीनामा देणार का?" असा सवाल राऊतांनी विचारला आहे.
"तिथले सत्ताधारी मंत्री, पालकमंत्री ते राजीनामा देणार का? त्या भागाचे खासदार कोण आहेत ते राजीनामा देणार का?" असा सवाल उपस्थित करत संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच त्यांचे पुत्र आणि स्थानिक खासदार श्रीकांत शिंदेंचा थेट उल्लेख न करता निशाणा साधला. "लोक आमच्याकडे येत आहेत हा विषय सरकारपर्यंत जावा. आम्ही जर रस्त्यावर आलो तर तुम्ही देशद्रोहाचा गुन्हा दाखल कराल," असा टोला राऊतांनी लगावला आहे.