मुंबई : #MeToo मोहिमेअंतर्गत गायिका सोना मोहापात्रा हिने लावलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपांनंतर संगीत दिग्दर्शक, गायक अनू मलिक यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात टीकेची झोड उठवण्यात आली. परिणामी 'इंडियन आयडॉल' या रिऍलिटी शोच्या परीक्षक पदावरुन त्याचा पायउतार झाला आहे. अनू मलिकची हकालपट्टी झाल्याची प्रतिक्रिया अनेक नेटकऱ्यांनी दिली.
गुरुवारी Indian Idol या शोIच्या संलग्न सूत्रांनी आयएएनएस या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार अनू मलिकचा कार्यक्रमाच्या परीक्षक पदावरुन पायउतार झाल्याचं सांगण्यात आलं.
२०१८पासून झाली सुरुवात...
२०१८ मध्ये पहिल्यांदाच सोना मोहापात्राने लैंगिक शोषणाचे आरोप करत अनू मलिकवर निशाणा साधला होता. परिणामी Indian Idolच्या दहाव्या पर्वातूनही त्याला काढता पाय घ्यावा लागला होता. गायिका नेहा भसिन, श्वेता पंडित यांनीही सोनाला साथ देत अनू मलिकविरोधात आवाज उठवला होता.
दहाव्या पर्वातून काढता पाय घ्यावा लागला तरीही अनू मलिकला पुन्हा अकराव्या पर्वासाठी परीक्षकपदी बोलवण्यात आलं. त्यावेळी सोना मोहापात्राने पुन्हा एकदा त्याच्याविरोधातील #MeToo मोहिम सुरू केली.
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरही सोना आणि इतर गायिकांना नेटकऱ्यांना या मोहिमेत पाठिंबा दिला. सोबतच कार्यक्रमाच्या परीक्षक पदावरुन त्याची हकालपट्टी केली जावी अशी मागणी उलचून धरली. याच धर्तीवर वाढता रोष पाहता अनू मलिकवर ही कारवाई केली गेल्याचं कळत आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी अनू मलिकने सोशल मीडियाचा आधार घेत आपल्यावर करण्यात आलेले सर्व आरोप तथ्यहिन आणि चुकीचे असल्याचं म्हटलं होतं.