मुंबई : अभिनेते अनिल कपूर सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतात. स्वत:च्या आयुष्यातील प्रत्येक अपडेट ते सोशल मीडियाच्या माध्यामातून चाहत्यांसोबत शेअर करत असतात. सोशल मीडियावर नियमितपणे पोस्ट देखील अभिनेता कायम शेअर करत असतात. इन्स्टावर त्यांचे 5.8 मिलीयन फॉलोअर्स आहेत, मात्र अलीकडेच या अभिनेत्याने सर्वांना चकित केलंय. खरंतर, अलीकडेच अभिनेता अनिल कपूरने त्याच्या सर्व पोस्ट आणि प्रोफाइल पिक्चर डिलीट केले आहेत. यानंतर चाहत्यांनी मिस्टर इंडिया सारख्या सोशल मीडिया अकाउंटवरून गायब झालेल्या अभिनेत्याबद्दल बरीच चर्चा करायला सुरुवात केली आहे.
मात्र 21 ऑक्टोबर रोजी अनिल कपूर इंस्टाग्रामवर परतले आणि एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये एक व्हिडिओ आहे, ज्यामध्ये अनिल कपूर यांनी मिस्टर इंडियाचे पात्र पुन्हा रिक्रेएट केल्याचं दिसत आहे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे हा व्हिडीओ एका जाहिरातीचा असल्याचं दिसत आहे.
अनिल कपूरचा मिस्टर इंडिया चित्रपट
मिस्टर इंडिया हा चित्रपट त्या काळातील सुपरहिट चित्रपट होता. हा चित्रपट 1987 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शक शेखर कपूर होते. या चित्रपटात त्याला त्याच्या वडिलांनी बनवलेले घड्याळ सापडतं आणि ते घातल्याने तो गायब होऊ शकतो. यानंतर कोणीही त्याला पाहू शकच नाही. त्याला फक्त लाल चष्मा घातल्यावर किंवा लाल लाईटमध्येच पाहिलं जाऊ शकायचं.आता ताज्या व्हिडिओमध्ये अनिल कपूरला मिस्टर इंडियाच्या भूमिकेत दाखवण्यात आले आहे. ते एका घरात प्रवेश करतात आणि तिथे त्यांना एक फोन सापडतो.
याशिवाय मिस्टर इंडियाच्या भूमिकेत असलेल्या अनिल कपूर यांनी या व्हिडिओत या फोनच्या वैशिष्ट्यांविषयी सांगितलं आहे. या फोनमध्ये उपलब्ध असलेल्या मॅजिक इरेजरबद्दलही त्यांनी सांगितलं आहे, ज्याचा वापर फोटोमधील इतर वस्तू काढण्यासाठी केला जातो. सध्या सोशल मीडियावर अभिनेत्याचा हा व्हिडीओ चर्चेत आहे. नेहमीच अनिल कपूर सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या चाहत्यांच्या संपर्कात असतात. सोशल मीडियावर अभिनेत्याने एखादी पोस्ट शेअर करताच ती व्हायरल होवू लागते.