मुंबई : प्रतिष्ठेच्या महोत्सवांसाठी निवड, मानाचा अरविंदन पुरस्कार मिळवलेला रेडू हा चित्रपट राज्य पुरस्कारांमध्येही चमकला आहे. सर्वोत्कृष्ट रंगभूषेच्या घोषित पुरस्कारासह रेडूला एकूण ९ नामांकनं मिळाली आहेत. त्यामुळे रेडू दणक्यात वाजतो आहे.
राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे देण्यात येणाऱ्या राज्य चित्रपट पुरस्कारांची नामांकनं नुकतीच जाहीर करण्यात आली. यात श्रीकांत देसाई यांना सर्वोत्कृष्ट रंगभूषेचा पुरस्कार जाहीर झाला. तर सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी शशांक शेंडे आणि छाया कदम, सर्वोत्कृष्ट गीतलेखनासाठी गुरू ठाकूर, सर्वोत्कृष्ट संगीत आणि पार्श्वसंगीतासाठी विजय नारायण गवंडे, सर्वोत्कृष्ट गायकासाठी अजय गोगावले, सर्वोत्कृष्ट कथा आणि पटकथेसाठी संजय नवगिरे यांना नामांकन मिळालं आहे. तसंच सर्वोत्कृष्ट १० चित्रपटांमध्येही निवड झाली आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शक सागर वंजारी म्हणाले, 'राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर रेडूची दखल घेण्यात आली आहे. आता राज्य पुरस्कारांमध्ये मिळालेल्या ९ नामांकनांनी चित्रपटाचा गौरव झाला आहे. माझ्या पहिल्याच प्रयत्नाचं होत असलेलं कौतुक प्रचंड आत्मविश्वास वाढवणारं आणि आनंददायी आहे.' नवल फिल्म्सच्या नवल किशोर सारडा यांचाही चित्रपट निर्मिती करण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. 'बऱ्याच वर्षांपासून चित्रपट निर्मिती करण्याची इच्छा रेडूच्या रुपानं पूर्ण झाली. कोणताही व्यावसायिक हेतू न ठेवता चांगली कलाकृती करण्याचं स्वप्न होतं. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महोत्सवांपाठोपाठ राज्य पुरस्कारांची आमच्य चित्रपटावर मोहोर उमटल्यानं अभिमान वाटतो,' असं सारडा यांनी सांगितलं.
या पूर्वी प्रतिष्ठेच्या कैरो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील इंटरनॅशनल कॉम्पिटिशन विभागात रेडूची निवड झाली होती. या विभागात निवड झालेला रेडू हा एकमेव भारतीय चित्रपट होता. कोलकाता महोत्सवात इंडियन कॉम्पिटिशन विभागासाठी रेडूची निवड झाली होती. त्या स्पर्धेत रेडू हा एकमेव मराठी चित्रपट होता. तसंच इफ्फीसारख्या महत्त्वाच्या महोत्सवात इंडियन पॅनोरमा विभागातही निवड झाली होती. केरळच्या चलत् चित्र अकादमीतर्फे दिग्दर्शक सागर वंजारी यांना पदार्पणाच्या चित्रपटासाठी मानाच्या अरविंदन पुरस्कारानं गौरवण्यात आलं होत.