लखनऊ/मुंबई : उत्तर प्रदेशात ‘पद्मावती’ सिनेमाच्या रिलीजवरून जोरदार आंदोलने करण्यात आली. त्यामुळे पोलिसांनी मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे.
‘पद्मावती’ सिनेमावर बंदी घालण्याची मागणी करण्यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आंदोलने केली गेली आहेत. आंदोलकांची आक्रामकता पाहता वेगवेगळ्या सिनेमागृहांजवळ पोलीस तैनात करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर पोलिसांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. संजय लीला भन्साली यांच्या ‘पद्मावती’मध्ये दीपिका पादुकोन, रणवीर सिंह, आणि शाहिद कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत. येत्या १ डिसेंबरला हा सिनेमा रिलीज होणार आहे. पण या सिनेमात इतिहासाला तोडून मोडून मांडल्याचं सांगत अनेक राजपूत संघटनांनी या सिनेमावर आक्षेप घेतला आहे.
तेच दुसरीकडे या पार्श्वभूमीवर सिनेमाचे दिग्दर्शक संजल लीला भन्साली यांना महाराष्ट्र सरकारने पोलीस सुरक्षा दिली आहे. भन्साली यांना सुरक्षा प्रदान केल्यामुळे ‘इंडियन फिल्म अॅन्ड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशन’ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. फिल्ममेकर अशोक पंडित म्हणाले की, ‘आमच्या सदस्याला पोलीस सुरक्षा प्रदान केल्याबद्दल आभार मानण्यासाठी आमच्याकडे शब्द नाहीयेत’.