riteish deshmukh and genelia d'souza : मराठी आणि हिंदी कलाजगतामध्ये (Bollywood) सराईताप्रमाणे वागणाऱ्या आणि प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या जोड्यांपैकी एक म्हणजे अभिनेता रितेश देशमुख (riteish deshmukh) आणि त्याची पत्नी जिनिलीया (genelia d'souza ). रुपेरी पडदा असो, एखादा पुरस्कार सोहळा असो किंवा मग एखादा कार्यक्रम असो, अगदी मुलांना शाळेतून आणायला गेलं असतानाही या जोडीवर सर्वांच्याच नजरा खिळतात. पण, आपण सर्वसामान्यांपैकीच एक आहोत असं वागत ते दोघंही आपल्या वर्तणुकीतून सर्वांच्या काळजाचा ठाव घेतात.
सध्या रितेश आणि जिनिलीया ज्या ज्या ठिकाणी जातात तिथे तिथे त्यांच्यासोबत त्यांची दोन मुलं, रिहान आणि राहीलसुद्धा जातात. हे दोन चिमुकले माध्यमांसमोर जेव्हाही येतात तेव्हा प्रत्येक वेळी माध्यमांच्या प्रतिनीधींपुढे हात जोडून त्यांचे आभार मानताना दिसतात. इतक्या कमी वयात त्यांच्यामध्ये असणारा हा समंजसपणा अनेकांना हेवा वाटावा असाच आहे. रितेशच्या मुलांना ही सवय नेमकी कशी लागली हाच प्रश्न तुम्हालाही पडलाय ना?
माध्यमांच्या प्रतिनिधींसमोर किंवा फोटोग्राफर्ससमोर हात जोडून त्यांना अभिवादन करण्याबाबत सांगताना रितेशनं आपल्याला मुलांनी एकदा प्रश्न विचारल्याचं म्हटलं. सगळे तुमचे फोटो का काढतात? हा त्यांचा प्रश्न होता. या प्रश्नाचं उत्तर देत रितेशनं त्यांना कळेल अशाच शब्दांत म्हटलं, 'तुमचे आईबाबा जे काम करतात त्यासाठी लोक त्यांचे फोटो काढतात आणि तुम्ही आमची मुलं आहात त्यामुळं तुमचेही फोटो काढतात'. इतक्यावरच न थांबता तुम्हीसुद्धा त्यांचे (फोटोग्राफर्सचे) हात जोडून आभार मानायचे असं रितेशनं त्यांना सांगितलं.
तुम्ही अजूनही असं काहीच केलं नाहीये की ते सर्वजण तुमचे फोटो काढतील. असं असतानाही तुमचे फोटो काढले जातात यासाठी तुम्ही कायम त्यांचे आभार माना, असं त्यानं मुलांना सांगितलं आणि त्यांनीही वडिलांचा शब्द पडू दिला नाही. म्हणूनच कुठेही अगदी कधीही रितेशची मुलं दिसो ते हात जोडून नमस्कार करतातच.
रितेश आणि जिनिलीयानं त्यांच्या दोन्ही मुलांना दिलेले हे संस्कार आणि त्यांना लावलेलं वळण इतरांना हेवा वाटेल असंच आहे. मुलं म्हणजे एका मातीच्या भांड्याप्रमाणे असतात. त्यामुळे त्यांना जसं वळण लावाल, त्यांच्यावर जसे संस्कार कराल ते तसेच घडत जातील. पुढे जाऊन हीच मुलं त्यांना मिळालेले संस्कार पुढच्या पिढीलाही देतील. त्यामुळं कोणत्याही पालकांसाठी त्यांच्या मुलानं भविष्यात एक सुजाण आणि संस्कारी होणं हीच समाधानकारक बाब असेल, नाही का?