Ram Aayenge Song Made Record : अयोध्येत प्रभू श्री रामांचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा मोठ्या थाटामाटात आणि जल्लोषात पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्री रामांची प्राणप्रतिष्ठाना करण्यात आली. यामुळे देशभरातील लाखो राम भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. अयोध्येत प्रभू श्री रामांचा प्राणप्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर प्रभू श्री रामांची अनेक गाणी सोशल मीडियावर ट्रेंड होत आहेत. पण यातील एका गाण्याने चक्क रेकॉर्ड बनवला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर 'राम आएंगे' हे गाणं सातत्याने चर्चेत आहे. या गाण्यावर आतापर्यंत सोशल मीडियावर अनेक रिल्स, व्हिडीओ बनवण्यात आले आहेत. हे व्हिडीओ व्हायरलही होताना दिसत आहेत. अयोध्येत प्रभू श्री रामांचा प्राणप्रतिष्ठापनेचा हा ऐतिहासिक सोहळा या गाण्यामुळे फारच खास झाला आहे. अयोध्येत प्रभू श्री रामांच्या प्राणप्रतिष्ठापनेपूर्वी आणि प्राणप्रतिष्ठेदरम्यान सर्वांच्याच ओठी 'राम आएंगे' हे भजन गुणगुणताना पाहायला मिळाले.
मिळालेल्या माहितीनुसार, आता या गाण्याने एक नवा रेकॉर्ड बनवला आहे. 'राम आएंगे' या गाण्यावर एका दिवसात 10 लाखांहून अधिक रिल्स बनवण्यात आले आहेत. तर आतापर्यंत गाण्याचा वापर करत जवळपास 36 लाखांहून अधिक रिल्स बनवले गेल्याची माहिती समोर येत आहे.
राम आएंगे हे गाणं विशाल मिश्रा यांनी गायले आहे. तर पायल देवने हे गाणे संगीतबद्ध केले आहे. राम आएंगे हे गाणे दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित करण्यात आले. या गाण्याला प्रभू श्री रामांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यावेळी सर्वाधिक यश मिळाले. सध्या हे गाणे लाखो लोकांच्या हृदयाचा ठाव घेताना दिसत आहेत. राम आएंगे या गाण्याला युट्यूबवर 26 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या गाण्यात दीपिका चिखलिया आणि समीर देशपांडे दिसत आहेत.
22 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराचे उद्घाटन केलं. अयोध्येतील राम मंदिर पारंपारिक नगर शैलीत बांधण्यात आलंय. हे मंदिर 2.7 एकरावर बांधलं असून ते 3 मजली आहे. त्याची लांबी 380 फूट आणि उंची 161 फूट आहे. या मंदिराचे प्रवेशद्वार 'सिंह द्वार' असून त्यात एकूण 392 खांब आहेत. याशिवाय मंदिरात 12 प्रवेशद्वार असतील. दरम्यान मंगळवारी अयोध्येत राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी एक विक्रम नोंदवण्यात आला आहे. मंदिर उघडण्याच्या पहिल्याच दिवशी तब्बल पाच लाख राम भक्तांनी रामललाचे दर्शन घेतल्याचं समोर आलं आहे. अयोध्येला पोहोचणाऱ्या भाविकांची गर्दी पाहता प्रशासनाने सर्व वाहनांना तातडीने बंदी घातली आहे.