मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेलविरोधात रांची न्यायालयाने अटक वॉरंट जाहीर केलं आहे. दिग्दर्शक अजय कुमार यांनी अमिषावर अडीच कोटी रुपयांचा चेक बाउन्सचा आरोप लावला आहे. २०१८ मध्ये देसी मॅजिक चित्रपट बनवण्यासाठी अजय कुमार यांनी अमिषाला अडीच कोटी रुपये उधार दिले होते. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पैसे परत करण्याचं अमिषाने सांगितलं होतं. पण २०१८ मध्ये चित्रपट प्रदर्शित झाला नाही. त्यानंतर दिग्दर्शकाने पैसे पुन्हा मागितले.
पैसे मागितल्यानंतर अमिषाने अडीच कोटीचा चेकही दिला. पण चेक बँकेत टाकल्यानंतर तो बाउन्स झाला. याचप्रकरणी अमिषाविरोधात रांची न्यायालयात फसवणुकीचा खटला दाखल आहे.
दिग्दर्शक अजय यांनी सांगतिलं की, न्यायालयात खटला दाखल केल्यापासून आतापर्यंत अमिषासोबत अनेकदा संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण अमिषा काही ना काही कारण देत किंवा कोणतीही प्रतिक्रिया न देता ही बाब टाळत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
अमिषाकडून प्रतिक्रिया येत नसल्याने दिग्दर्शकाने कायदेशीर नोटीस पाठवली. त्यालाही अमिषाने उत्तर दिलं नाही. गेल्या वर्षी रांची न्यायालयात तक्रार दाखल केली. त्यानंतर आता न्यायालयाने अटक वॉरंट जाहीर केलं आहे.
याआधीदेखील अमिषावर तक्रार दाखल करण्यात आली आहे. रांचीमध्ये एका कार्यक्रमासाठी अभिनेत्रीने पैसे घेतल्यानंतरही कार्यक्रमात भाग घेतला नव्हता. इव्हेन्ट कंपनीने यावर्षी फेब्रुवारीमध्ये तिच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती.