मुंबई : रिंकू राजगुरू या आपल्या गावच्या लेकीला बघायला झालेली गर्दी...
तिची छबी टिपण्यासाठी सरसावलेले मोबाईल.. मुहुर्ताच्या क्लॅपनंतर लाईट कॅमेरा अॅक्शन म्हणून चित्रीत झालेला प्रसंग आणि वाजलेल्या टाळ्या, शिट्ट्या.. असं वातावरण होतं कागर चित्रपटाच्या सेटवर! रिंकू राजगुरूची मुख्य भूमिका असलेला मकरंद माने दिग्दर्शित "कागर" या चित्रपटाचा मुहूर्त खासदार मा. विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते नुकताच झाला.
या वेळी शिवरत्न शिक्षण संस्थेचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते पाटील, सोलापूर जिल्हा परिषद सदस्या शीतलदेवी मोहिते पाटील, अकलूजचे सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील, उपसरपंच धनंजय देशमुख, किशोरसिंह माने पाटील, उदाहरणार्थ निर्मितचे सुधीर कोलते आणि विकास हांडे आदी उपस्थित होते.
चित्रपटाला शुभेच्छा देऊन धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले, 'आज अकलूजचे अनेक कलाकार चित्रपट क्षेत्रात नाव कमावत आहे. रिंकू आणि मकरंद यांनी अकलूजचे नाव मोठं केलं आहे. त्यांच्या चित्रपटाचं चित्रीकरन माळशिरस तालुक्यात होणं ही अभिमानाची बाब आहे. या क्षेत्रात अनेक संधी निर्माण होत आहेत. तरूणांनी त्याचा विचार करावा. तसंच पालकांनीही त्यांना प्रोत्साहन द्यावं.'
रिंकूचा नवा चित्रपट म्हणून चर्चेत आलेल्य "कागर" या चित्रपटाची अॅक्शन सुरू झाली आहे. त्यामुळे चित्रपटाविषयी आता खऱ्या अर्थानं उत्सुकता निर्माण झाली आहे.