Aditi Sharma On Khatron Ke Khiladi 14 :छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक कार्यक्रम म्हणून 'खतरों के खिलाडी' या कार्यक्रमाला ओळखले जाते. रोहित शेट्टीचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'खतरों के खिलाडी' (Khatron Ke Khiladi 14) या कार्यक्रमाचे 14 वे पर्व सुरु झाले आहे. थरारक स्टंट्स आणि साहसी खेळामुळे या कार्यक्रमाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ पाहायला मिळते. सध्या या कार्यक्रमाचे शूटींग रोमानियामध्ये सुरु आहे. कलीरे आणि नागिन 3 या कार्यक्रमामुळे प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री अदिती शर्मा ही 'खतरो के खिलाडी' या कार्यक्रमात सहभागी झाली आहे. आता अदितीने यासाठी कशी तयारी केली आहे, याबद्दल भाष्य केले आहे.
अदिती शर्माने नुकतंच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत अदितीला 'खतरो के खिलाडी' या कार्यक्रमात सहभागी होण्याबद्दल विचारण्यात आले. यासाठी काही विशेष तयारी केली का? असा प्रश्न अदितीला विचारण्यात आला होता. यावर ती म्हणाली, मी या कार्यक्रमासाठी शारीरिक प्रशिक्षण घेतले. त्यासोबतच मी कर्बोदक (Carbs) कमी करण्यावरही प्रचंड मेहनत घेतली. कर्बोदकांमधे जास्त ऊर्जा असते, हे मला माहिती आहे. पण कर्बोदके कमी करताना मी प्रोटीन घेणे सुरु केले. कारण प्रथिने तुम्हाला शक्ती देतात, ज्यामुळे तुम्हाला शारीरिक हालचाली करण्यासाठी मदत मिळते.
मी याकाळात कोणतेही जंक फूड खाल्ले नाही. मी गेल्या 6 महिन्यांपासून पोटात चरबी जाऊ नये, यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करत आहे. त्यामुळे मी 6 महिने चपाती किंवा भात खाल्लेला नाही. मी फक्त डाळ आणि पनीर खात आहे. कारण त्यात भरपूर प्रथिने असतात. पण काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी गमवावे लागते, असे अदिती शर्मा म्हणाली.
'खतरो के खिलाडी' 14 या कार्यक्रमासाठी माझे आई-वडिल माझ्यापेक्षा जास्त उत्सुक आहेत. मी हा कार्यक्रम जिंकेन असा त्यांना पूर्ण विश्वास आहे. मी या कार्यक्रमात जाऊन मजा करणार आहे. तिथे जाण्यासाठी मी फारच उत्सुक आहे आणि त्यासोबत भीतीही वाटत आहे. मी जेव्हा कार्यक्रमात स्टंट करेन तेव्हा मला कोणत्या गोष्टींच भीती वाटते, याची कल्पना येईल, असेही अदिती शर्माने सांगितले.
दरम्यान 'खतरों के खिलाडी' 14 व्या पर्वात कृष्णा श्रॉफ, अझिम रिआज, सुमोना चक्रवर्ती, गश्मीर महाजनी, आशिष मेहरोत्रा, शिल्पा शिंदे, अभिषेक कुमार, नियती फतनानी, करणवीर मेहरा, अदिती शर्मा, निमरत कौर अहुवालिया, शालिन भनोट हे कलाकार झळकणार आहेत. हा कार्यक्रम येत्या जुलै महिन्यापासून सुरु होणार असल्याचे बोललं जात आहे. मात्र अद्याप या कार्यक्रमाच्या प्रदर्शनाची तारीख समोर आलेली नाही.