Sankarshan Karhade : छोट्या पडद्यावरील 'चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रम चांगलाच लोकप्रिय कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम म्हटलं की लगेच सगळ्यांना आठवतात त्यातले सगळेच कलाकार. या कार्यक्रमानं सगळ्यांना हसून हसून वेड केलं आहे. पण हा कार्यक्रम अभिनेता संकर्षण कऱ्हाडेशिवाय अपूर्ण आहे. संकर्षण हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तो चाहत्यांच्या संपर्कात राहतो. संकर्ष गेल्या काही दिवसांपूर्वी बस चालवल्याच्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आला होता. आता संकर्षणनं त्याच्या करिअरच्या सुरुवातीला तो कसा प्रवास करायचा आणि महिलांच्या डब्यातील एक किस्सा त्यानं सांगितला आहे.
संकर्षणनं नुकतीच ही मुलाखत ‘राजश्री मराठी’ला दिली आहे. या मुलाखतीत संकर्षणनं हा किस्सा सांगत म्हणाला, "मला अचानक जेव्हा मुंबईला यावं लागायचं तेव्हा बाबांकडे पैसे कसे मागणार. मग मी आमच्या घराच्या वर एक शिक्षक राहायचे, सच्चिदानंद खडके म्हणून! त्यांच्याकडून 4ते 5 हजार रुपये उधार घ्यायचो आणि रात्री रेल्वेमध्ये बसायचो. 12 तासांचा प्रवास करून परभणीहून मुंबईला यायचो. रिझर्व्हेशन वगैरे काही नाही. मग रात्रभर उभं राहूनच प्रवास करायचो. दादरला उतरल्यानंतर मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय आहे. तिथे 100 रुपयांत 24 तासांसाठी बेड मिळतो. तिथं जायचं, अंघोळ करायची, तासभर झोपायचं. मग फिल्मसिटी शोधायची. मग परत दादरला यायचं."
हेही वाचा : Gandii Baat फेम अभिनेत्री अडकली विवाह बंधनात? फोटो व्हायरल
पुढे याविषयी सांगतना संकर्षण म्हणाला, "एकदा मी दादरला आलो. ट्रेनमध्ये चढलो आणि मला वाटलं की या लोकलच्या डब्यात वरती जे हॅण्डल आहेत ते फार वर दिसत आहेत. ते थोडे खाली असायला हवे होते. मग मी गोरेगावला गेलो. फिल्मसिटीमध्ये माझं शूट संपवलं आणि परत यायला निघालो. जेव्हा मी ट्रेनमध्ये चढलो तेव्हा माझ्या लगेच लक्षात आले की हे हॅण्डल तर खाली आले आहेत. मी मनात विचार करू लागलो की सकाळी मला वाटलं की हे हॅण्डल खाली असायला हवेत आणि आता लगेच ते खाली आले सुद्धा. मग कुणी तरी येऊन सांगितलं अहो, हा लेडीज डब्बा आहे. तुम्ही इथे का आलात? चला खाली उतरा. मग मी गुपचूप खाली उतरलो. तर जेव्हा मी सुरुवातीला यायचो तेव्हा असे गोंधळ माझ्यासोबत खूप व्हायचे.” संकर्ष हाा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे.